कोल्हापूर :
कोल्हापूर जिल्हा आर्थिकदृष्ट्या सधन जिल्हा असून, जिह्यामध्ये सायबर आणि आर्थिक फसवणुकीचे प्रमाण जास्त आहे. याचसोबत मुला मुलीं जन्मदरामध्ये तफावत असून, स्त्रीभ्रूण हत्येचे प्रमाण अधिक असल्याचे दिसत आहे. हे गुन्हे रोखण्यासाठी स्वतंत्र्य कक्षाची स्थापना करणार असल्याची माहिती नूतन पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी दिली.
नूतन पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी मंगळवारी सायंकाळी दसरा चौक येथील तरुण भारत संवाद कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी तरुण भारतचे संस्थापक कै. बाबुराव ठाकूर यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. विभागीय संपादक डॉ. श्रीरंग गायकवाड यांच्यासोबत जिह्यातील विविध विषयांवर चर्चा केली. निवासी संपादक सुधाकर काशीद, व्यवस्थापन अधिकारी राहुल शिंदे, जाहिरात व्यवस्थापक (शहर) मंगेश जाधव, मुख्य प्रतिनिधी संतोष पाटील, वरिष्ठ बातमीदार कृष्णात चौगुले उपस्थित होते.
शहरात महिला सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यावर भर दिला जाणार आहे. ग्रामीण भागातून मुलींचे पळून जाण्याचे प्रमाण जास्त आहे. याबाबत शाळा आणि महाविद्यालयांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. जिह्यात सायबर गुह्यांचे प्रमाण आहे. याबाबत जनजगृती सुरु आहे. तरीही नागरीक याला बळी पडताना दिसत आहेत. यासाठीही स्वतंत्र यंत्रणा उभा करुन सायबर गुन्हे आणि डिजीटल अॅरेस्टचे प्रकार थांबविण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे योगेशकुमार गुप्ता यांनी सांगितले. पावसाळ्यात पूरपरिस्थिती कशा पद्धतीने हाताळायची याबाबत जिल्हा प्रशासनासोबत बैठक घेण्यात आली असून, लवकरच याबाबतचे मॉकड्रील घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
- पर्यटन स्थळांवरील बंदोबस्त वाढवला
सध्या शाळा, महाविद्यालयांना सुट्टी असून यामुळे पर्यटन वाढले आहे. जिह्यात पावसाचा जोर वाढला आहे. यामुळे नागरीक पर्यटन स्थळे, धबधबे या ठिकाणी जात आहेत. खबरदारीच्या योजना म्हणून पर्यटन स्थळी बंदोबस्त वाढविण्याच्या सूचना प्रत्येक पोलीस स्टेशनला देण्यात आल्या असून, सोबतच नवीन निर्माण झालेली पर्यटन स्थळे शोधून त्या ठिकाणी बंदोबस्त नेमण्यात यावा अशा सुचनाही यावेळी करण्यात आल्याचे गुप्ता यांनी सांगितले.
- अवैद्य धंदे, खासगी सावकारीवर कारवाई करणार
शहरासह जिह्यात छुप्या पद्धतीने अवैद्य धंदे सुरु असल्यास त्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. पोलीस यंत्रणेला चकवा देऊन जर अशा पद्धतीने मटका, आणि जुगार अड्डे सुरु असतील तर त्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे. याचसोबत जिह्यामध्ये खासगी सावकारांचे प्रमाण आणि त्याबद्दल दाखल होणाऱ्या गुह्यांचे प्रमाणही जास्त आहे. खासगी सावकारांविरोधातही कडक कारवाई करण्याचा इशाराही यावेळी पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी दिला.
- गांजा, अंमली पदार्थांविरोधात धडक मोहीम
जिह्यात गांजा आणि अंमली पदार्थांच्या विरोधात यापूर्वीही धडक कारवाई करण्यात आली आहे. यापुढेही अशीच कारवाई सुरु राहणार आहे. शहरासह जिह्यात यापूर्वी बड्या गांजा विक्रेत्यांवर धडक कारवाई करुन, अफू, गांजा, मेफेड्रोनसह इतर अंमलीपदार्थ जप्त करण्यात आले आहे. आता मोठ्या विक्रेत्यांसोबत छोट्या खरेदीदारांवरही कारवाई करण्यात येणार असल्याचेही पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी सांगितले.








