अनिल जोशी यांचे प्रतिपादन : आरपीडीमध्ये एक दिवसीय हिंदी चर्चासत्र
प्रतिनिधी / बेळगाव
भारतीय भाषांमधील साहित्यातून राष्ट्रीयत्वाची भावना वृद्धींगत होणे गरजेचे आहे. स्थानिकांनी अभ्यासपूर्वक पुनश्च इतिहास लिहिणे गरजेचे आहे. लॉर्ड मेकॉलेच्या विचारसरणीचे दिवस मागे पडून शिक्षणातून रोजगाराच्या समस्या सुटणे गरजेचे आहे. अनेक भाषांची देणगी लाभलेल्या बेळगावमधून भाषा ही पोटाची भ्रांत सोडवेल, असा आशावाद वाटतो, असे प्रतिपादन नवी दिल्ली येथील भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या केंद्रीय शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष अनिल जोशी यांनी केले.
केंद्रीय हिंदी संस्थान आग्रा, कर्नाटक राज्य विद्यापीठ कॉलेज हिंदी प्राध्यापक संघ बेंगळूर व आरपीडी महाविद्यालयाच्या हिंदी विभागाच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. आरपीडी कॉलेजच्या के. एम. गिरी सभागृहात राष्ट्रीयस्तरावरील चर्चासत्र पार पडले. व्यासपीठावर आग्रा येथील हिंदी संस्थानच्या संचालिका प्रा. बिना शर्मा, राजभाषा विभाग, गृहमंत्रालय भारत सरकारचे सेवानिवृत्त क्षेत्रिय साहाय्यक निवेदक डॉ. जयशंकर यादव, बेंगळूर येथील डीआरडीओचे वरिष्ठ वैज्ञानिक राजू डी. नविंदगी, एसकेई सोसायटीचे उपाध्यक्ष एस. वाय. प्रभू, आरपीडी महाविद्यालयाचे प्राचार्या डॉ. अनुजा नाईक, माजी प्राचार्या अरुणा नाईक, डॉ. मंजुनाथ, हिंदी प्राध्यापक संघ आरसीयूचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र पोवार यांसह इतर उपस्थित होते.
प्रा. बिना शर्मा यांनी राष्ट्र आणि संस्कृती यांना जोडणारा दुवा म्हणून शिक्षकाचा उल्लेख केला. अनेक कवींचा संदर्भ देताना त्यांनी कथनी आणि करणी यामध्ये फरक नसावा, असे आवाहन केले. राजू नविंदगी यांचे हिंदीतील मनोगत उपस्थितांची वाहव्वा मिळवून गेले. लेखक कमलाकांत त्रिपाठी यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. माजी प्राचार्या अरुणा नाईक यांनी आपले मनोगत सादर केले. प्राचार्या डॉ. अनुजा नाईक यांनी अध्यक्षीय भाषणातून विविध विषयांवर आपली मते मांडली. डॉ. राजेंद्र पोवार यांनी उपस्थितांचे स्वागत केले. डॉ. एस. ए. मंजुनाथ यांनी प्रास्ताविक केले. राणी चन्नम्मा विद्यापीठ, कॉलेज हिंदी प्राध्यापक संघाच्या वेबसाईटचे अनावरण डॉ. यादव यांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. एस. ए. मंजुनाथ लिखित ‘भारतीय संत साहित्य परंपरा’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी ‘कवयित्री शकुन विजय स्मृती स्वरचित हिंदी कविता’ स्पर्धेतील विजेत्यांना गौरविण्यात आले. डॉ. विजयकुमार यादव यांनी आभार मानले. या चर्चासत्राला बेळगावसह परिसरातील हिंदी प्राध्यापक उपस्थित होते.









