उचगाव / प्रतिनिधी
कटलेला पतंग मिळवण्याच्या नादात मित सचिन भंडारी (वय ११ रा. दोस्ती ग्रुप जवळ उचगाव ता. करवीर) या शाळकरी मुलाचा खणीच्या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. उचगांव येथे पुणे बेंगलोर महामार्गावर साई पेट्रोल पंपानजीकच्या खाणीत शनिवारी रात्री ही दुर्दैवी घटना घडली. मीत कोल्हापूर येथील खासगी शाळेत पाचवी इयत्तेत शिकत होता. हुशार असलेल्या मीतच्या जाण्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
शनिवारी सायंकाळी पतंग उडविण्याचा आनंद मुले घेत होती. कटलेला पतंग मिळविण्यासाठी अनेक जण प्रयत्न करीत होते मात्र हाच प्रयत्न अंगलट येवून एका शाळकरी मुलाला जीव गमवावा लागला. अतिशय हुशार असलेल्या मीतही कटलेला पतंग मिळवण्याच्या प्रयत्नात खणीच्या पाण्यात पडला व त्यातच त्याचा बुडून मृत्यू झाला. बेपत्ता झालेल्या मितला शोधण्यासाठी शनिवारी सायंकाळी आई वडील, मित्र, नातेवाईक, पोलीस यांनी खूप प्रयत्न केले. मात्र अंधारामुळे त्यात यश आले नाही. रविवारी सकाळी पुन्हा शोधमोहीम सुरू करण्यात आली. सकाळी नऊ वाजता खणीत मितचा मृतदेह तरंगत असल्याचे पोलिसांना आढळून आला. यावेळी मृत मीतच्या हातात पतंगाची दोरी व पतंग होता. मीतचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सीपीआर रुग्णालयात हलवण्यात आला. यावेळी त्याचा पाण्यामध्ये बुडून मृत्यू झाल्याचे प्रशासनाने जाहीर केले. मीतचे वडील खाजगी नोकरी करतात तर आई गृहिणी आहे. मीतला अजून एक लहान भाऊ आहे. मृतदेह घरी आणल्यावर आई-वडिलांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. याबाबत गांधीनगर पोलीस ठाण्यात नोंद झाली असून अधिक तपास सहाय्यक फौजदार राजू चव्हाण करीत आहेत.