प्रतिनिधी/ बेळगाव
कंपाऊंडला मारलेल्या संरक्षक जाळीतून विजेचा धक्का बसून अनगोळ येथील एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. शनिवार दि. 14 ऑक्टोबर रोजी सकाळी भाग्यनगर येथे ही घटना घडली असून यासंबंधी टिळकवाडी पोलीस स्थानकात दोघा जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
रजत सुमित गौरव (वय 14) मूळचा राहणार गडापांडे, ता. हरिया, जि. बस्ती, उत्तरप्रदेश, सध्या रा. धर्मवीर संभाजी चौक, अनगोळ असे त्या दुर्दैवी विद्यार्थ्याचे नाव आहे. रजतचे वडील सुमित यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भाग्यनगर दहावा क्रॉस येथील ज्यांच्या घरासमोर ही घटना घडली, त्या कल्लाप्पा सत्याप्पा चौगुले व अनगोळ येथील सुनील रामचंद्र जाधव या दोघांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कल्लाप्पा चौगुले यांच्या घरासमोर कार धुण्यात येत होती. त्यांनी या मुलाला पाण्याचा पाईप देण्यास सांगितले. पाईप देताना कंपाऊंडमधील संरक्षक जाळीतून विजेचा धक्का बसून त्याचा मृत्यू झाला आहे.
पोलीस उपनिरीक्षक संतोष दळवाई यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. शाळकरी मुलाच्या मृत्यूने कुटुंबीयांना धक्का बसला असून त्यांचा एकच आक्रोश सुरू होता. कुटुंबीयांनी मृतदेह घरासमोरच ठेवून संबंधितांना अटक करण्याची मागणी लावून धरली होती.









