भिलवडी / घनशाम मोरे :
सांगली जिल्ह्यातील आमणापूर येथील डुकरीभाग शिवारात सध्या एक आगळेवेगळे आणि मनमोहक दृश्य पाहायला मिळत आहे. मान्सूनपूर्व आणि मान्सूनच्या सुरुवातीच्या पावसामुळे जलमय झालेल्या या शिवारात विविध प्रजातींच्या पक्षांनी अक्षरशः आपली शाळा भरवली आहे. जलमय शिवार हा शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय असला तरी पक्षांसाठी मात्र हा डुकरीभाग परिसर उत्तम नैसर्गिक अधिवास बनला आहे.
येथील स्थानिक शेतकरी आणि पक्षी निरीक्षकांच्या मते, दरवर्षी पावसाळ्यात या भागात पाणी साचल्याने अनेक स्थलांतरित पक्षी आणि स्थानिक पक्षी येथे मोठ्या संख्येने येतात. यंदाही चित्र वेगळे नाही. ढगळ वातावरण, अधूनमधून पडणारा पाऊस आणि पाण्याने भरलेली शेतं यामुळे पक्षांसाठी हे ठिकाण नंदनवन बनले आहे.
या ‘पक्षांच्या शाळेत’ चित्रबलाख, अढई, चमचे, हळदी कुंकू बदक, ब्लॅक हेडेड आयबीस, ब्लॅक आयबीस, लाजरी पाणकोंबडी, जांभळी पाणकोंबडी, शेकाट्या, टिटवी, बामणमैना, करकोचे, बगळे, पाणकावळे, बदके तसेच विविध प्रकारच्या लहान पाणपक्ष्यांचा किलबिलाट ऐकायला मिळत आहे. हे पक्षी थव्याने पाण्यात फिरताना, मासे पकडताना आणि पंख साफ करतानाचे दृश्य डोळ्यांचे पारणे फेडणारे आहे. काही पक्षी तर आपली पिल्ले घेऊन येथे आले असून, त्यांना पाण्याच्या सान्निध्यात जगण्याचे धडे गिरवताना दिसत आहेत.
पक्षीप्रेमी संदीप नाझरे यांनी या परिसरात काही महत्त्वपूर्ण पक्षी नोंदी इ बर्ड या संकेतस्थळावर केल्या आहेत. त्यांच्या माहितीनुसार, आमणापूर परिसरात अढई पक्षांची पहिल्यांदाच नोंद झाली आहे, जी पक्षी निरीक्षणासाठी एक आनंदाची बाब आहे. तसेच, चित्रबलाख पक्षांची संख्या लक्षणीय असून, १८ चित्रबलाख पक्षांची नोंद झाली आहे. हे उंचापुरे, देखणे आणि रूबाबदार पक्षी सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. १२ चमचा पक्षांचीही नोंद झाली असून, या परिसरात रूबाबदार ऐटीत चालणाऱ्या ब्लॅक क्राऊनडू हेरॉन पक्षाचाही वावर दिसून आला आहे. ही पक्षी निरीक्षणासाठी एक आनंदाची बाब आहे.
या परिसरात केवळ पक्षांचाच नव्हे, तर मगरीचाही अधिवास पाहायला मिळत आहे. यामुळे परिसरातील जैवविविधता अधिक समृद्ध झाल्याचे दिसून येते. यामुळे पर्यावरणाचा समतोल राखला जात आहे. जलमय झालेल्या शेतीत पक्षांचे असे वास्तव्य हे पर्यावरणाच्या समतोलासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. हे पक्षी शेतीतील किडे आणि अळ्या खाऊन शेतकऱ्यांची अप्रत्यक्षपणे मदत करत असल्याचेही मत व्यक्त होत आहे.
डुकरीभाग आमणापूर येथील हे विहंगम दृश्य पाहण्यासाठी पक्षीप्रेमी आणि छायाचित्रकारांची याठिकाणी मोठी गर्दी करत आहेत. हा परिसर डोळे सुखावणारा आहे.








