2.61 कोटी रुपये जप्त : सीबीआयची कारवाई
वृत्तसंस्था/ लखनौ
सीबीआयने के. सी. जोशी नावाच्या रेल्वे अधिकाऱ्याला लाचखोरी प्रकरणात अटक केली असून त्याच्या घरातून कोट्यावधी रुपये जप्त करण्यात आले आहेत. सदर अधिकारी गोरखपूरमध्ये कार्यरत होता. अधिकाऱ्याच्या घरावर छापा टाकला असता घरातून 2.61 कोटी रुपये जप्त करण्यात आले. सीबीआयने ईशान्य रेल्वेचे प्रधान मुख्य व्यवस्थापक के. सी. जोशी यांना 3 लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी अटक केली आहे.
त्यांच्याविरोधात लाचखोरीचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. तक्रारदाराच्या फर्मची जीईएम पोर्टलवरील नोंदणी रद्द न करण्यासाठी जोशी यांनी 7 लाख रुपयांची मागणी केली होती. याबाबतची माहिती सीबीआयला मिळताच त्यांनी सापळा रचून आरोपीला तक्रारदाराकडून तीन लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. गोरखपूर आणि नोएडा येथे आरोपींच्या अधिकृत आणि निवासी जागेवर झडती घेतल्यानंतर 2.61 कोटी रुपये इतक्या रोख रकमेसह अन्य महत्त्वाचे दस्तावेज जप्त करण्यात आले आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपीला लखनौ येथील न्यायालयात हजर करण्यात आले आहे.









