कुंडल :
सागरेश्वर अभयारण्याला कुंडल गावाच्या बाजूने सावित्रीबाई फुलेनगर ते कुंडल प्रादेशिक योजनेपर्यंत कुंपन नसल्याने व जागोजागी स्थानिक शेतकऱ्यांनी कुंपनाची जाळी तोडून केलेली वाटेमुळे अभयारण्यातील वन्यप्राणी अन्न व पाण्याच्या शोधात वारंवार बाहेर येण्याचे प्रमाण वाढले आहे. गेल्या सहा महिन्यात सांबर विहिरीत पडण्याची ही दुसऱ्यांदा घटना घडली आहे. मागील वेळेस विहिरीत पडलेल्या सांबराला वनविभागाच्या सागरेश्वर अभयारण्य व पलूस-कडेगाव वनविभाग यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे जीव गमवावा लागला होता. मात्र यावेळेस घटनेचे गांभीर्य ओळखून पलूस-कडेगावचे वनक्षेत्रपाल संतोष शिरशेटवार यांनी तातडीने घटनास्थाळावर रेस्क्यू टीम पाठवून विहिरीत पडलेल्या सांबराला जीवदान देण्यात यश मिळविले आहे. असे असले तरी अभयारण्यातील वन्यप्राण्याच्या सुरक्षिततेचा प्रश्न अनुत्तरीतच आहे.
सोमवारी सायंकाळच्या दरम्यान अभयारण्यातील एक सांबर अन्नाच्या शोधात कुंपनाच्या बाहेर कुंपनालगत असणाऱ्या स्वामी मळ्यात आले होते. त्याला विहिरीकडेला पडलेले सांबर. असणाऱ्या गवताचा अंदाज न आलेने ते विहिरीत पडले. सांबर विहिरीत पडल्याचे स्थानिक तरुणांच्या लक्षात येताच त्यांनी वनविभागाशी संपर्क साधला.
कडेगाव-पलूसचे वनक्षेत्रपाल संतोष शिरसाटवार यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक सुरेखा लोहार, गणेश कांबळे, नितीन पवार व वन्यजीव बचाव टीमचे कुरेश मुजावर, अक्षय पवार, तन्मय कांबळे, कृष्णा वड्ड व पुण्याच्या वन्यजीव रेस्क्यू टीमने कुंडलमधील तेजस फासे, सूरज निवळे सिध्देश टकले, संतोष जंगम, गोपी जंगम यांच्या मदतीने सांबराला विहिरीतून सुरक्षित बाहेर काढले. सांबर विहिरीबाहेर येताच त्याने अभयारण्याच्या दिशेने धूम ठोकली. यावेळी अधिकाऱ्यांसह सर्वांनीच सुटकेचा निश्वास टाकला.
- पाणी कमतरतेमुळे वन्यप्राण्यांचा जातोय जीव
फुलेनगर व गणेशनगरमधील पन्नास एक घरांच्या अतिक्रमण प्रश्नामुळे या भागात अभयारण्याच्या कुंपणाचे काम अपूर्ण आहे. तसेच स्थानिक शेतकऱ्यांनी ये-जा करण्यासाठी कुंपनाची तोडलेली जाळी व अभयारण्य क्षेत्रात प्राण्यांना पुरेसा चारा, पाणी उपलब्ध होत नसल्याने हे वन्यप्राणी पाणी, चाऱ्याच्या शोधात या रिकाम्या वाटेतून बाहेर येऊन आसपासच्या पिकांचे नुकसान करत आहेत. तसेच पाण्यासाठी आपला जीव धोक्यात घालत आहेत. त्यामुळे वनविभागाने तातडीने अपुऱ्या कुंपनाचा प्रश्न मार्गी लावावा.








