वृत्तसंस्था/ सेंच्युरियन
सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर असलेल्या भारतीय कसोटी संघाला पहिल्या सामन्यात दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. सेंच्युरियनच्या खेळपट्टीवर वेगवान आणि उसळत्या गोलंदाजीचा चांगलाच प्रभाव जाणवला. या दौऱ्यासाठी भारतीय संघात चार वेगवान गोलंदाजांना संधी देण्यात अली. त्यामध्ये कसोटी पर्दापण करणाऱ्या कर्नाटकाच्या प्रसिद्ध कृष्णाचा समावेश होता. पण दक्षिण आफ्रिकेच्या डीन एल्गार, डेव्हिड बेडिंगहॅम आणि मार्को जेनसन यांच्या समोर शार्दुल ठाकूर आणि प्रसिद्ध कृष्णा यांची गोलंदाजी निष्प्रभ असल्याचे पहावयास मिळाले. मोहम्मद शमीची उणीव कधी नव्हे ती भारतीय संघाला अधिक प्रखर जाणवली आहे.
सेंच्युरियनच्या खेळपट्टीवर बुमराहने समाधानकारक गोलंदाजी केली. पण त्याला ठाकुर, प्रसिद्ध कृष्णा आणि मोहम्मद सिराज यांच्याकडून साथ मिळू शकली नाही. बुमराह, शमी आणि मोहम्मद सिराज यांच्या समोर आता ईशान शर्मा आणि उमेश यादव निस्तेज होत असल्याने त्यांची कसोटी कारकीर्द जवळपास संपुष्टात आली आहे. आता त्यांची कसोटीतील निवृत्तीची घोषणा बाकी राहिली आहे. दरम्यान प्रसिद्ध कृष्णाचा संघातील समावेश म्हणजे खोगीर भरती असल्याचे जाणवले. आता दुसऱ्या कसोटीसाठी आवेश खानला तातडीने पाचारण करण्यात आले आहे. शार्दुल ठाकुर कसोटी संघातील आपली जागा स्थिर ठेऊ शकत नसल्याचे दिसून येते. भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यात कसोटी मालिका खेळताना सर्वच विभागात दर्जेदार कामगिरी करावी लागेल, तरच भारताला विजयाची आशा बाळगता येईल.









