इंग्लंडचा तीन धावांनी पराभव : मालिकेत 1-1 अशी बरोबरी
वृत्तसंस्था/ साऊदम्पटन
अॅशेस मालिकेतील सध्या इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील येथे रविवारी झालेल्या दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने यजमान इंग्लंडचा केवळ 3 धावांनी पराभव करत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. ऑस्ट्रेलिया संघातील अॅलिना किंगला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.
या मालिकेत इंग्लंडने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजी दिली. ऑस्ट्रेलियाने 50 षटकात 7 बाद 282 धावा जमविल्या. त्यानंतर इंग्लंडने 50 षटकात 7 बाद 279 धावांपर्यत मजल मारल्याने त्यांना हा सामना 3 धावांनी गमवावा लागला. इंग्लंडच्या नॅट स्किव्हेर ब्रंटचे नाबाद शतक वाया गेले. ऑस्ट्रेलियातर्फे इलेसीपेरी आणि सदरलँड यांनी शानदार अर्धशतके झळकवली. ऑस्ट्रेलियाच्या किंगने 44 धावात 3 गडी बाद केले.
ऑस्ट्रेलियाच्या डावामध्ये इलेसीपेरीने 124 चेंडूत 1 षटकार आणि 9 चौकारांसह 91, सदरलँडने 47 चेंडूत 6 चौकारांसह 50, बेथमुनीने 42 चेंडूत 5 चौकारांसह 33, गार्डनरने 37 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 33, वेरहॅमने 14 चेंडूत 3 षटकार आणि 3 चौकारांसह नाबाद 37 धावा जमवल्या. कर्णधार हिली 2 चौकारांसह 13 धावांवर बाद झाली. ऑस्ट्रेलियाच्या डावात 5 षटकार आणि 28 चौकार नोंदविले गेले. ऑस्ट्रेलियाचे पहिले अर्धशतक 54 चेंडूत, शतक 121 चेंडूत, दीडशतक 192 चेंडूत, द्विशतक 244 चेंडूत आणि 250 धावा 288 चेंडूत फलकावर लागल्या. पहिल्या पॉवर प्ले दरम्यान ऑस्ट्रेलियाने 59 धावा जमविताना 2 गडी गमावले. पेरी आणि सदरलँड यांनी सहाव्या गड्यासाठी 81 धावांची भागिदारी केली. इंग्लंडतर्फे इक्लेस्टोन आणि बेल यांनी प्रत्येकी 3 तर ग्लेनने 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना इंग्लंडच्या डावाला चांगली सुरुवात झाली. बेमाँट आणि डंकले यांनी सलामीच्या गड्यासाठी 66 धावांची भागिदारी केली. बेमाँटने 62 चेंडूत 8 चौकारांसह 60 धावा जमविल्या. डंकलेने 1 चौकारासह 13 तर कर्णधार नाईटने 1 चौकारासह 12 धावा केल्या. कॅप्से 2 धावावर तर वेट 8 धावावर बाद झाली. इक्लेस्टोन केवळ एका धावेवर पायचीत झाली. अॅमी जोन्सने 34 चेंडूत 3 चौकारांसह 37 धावा जमविल्या. नॅट स्किव्हेर ब्रंटने शेवटपर्यंत खेळपट्टीवर राहून 99 चेंडूत 10 चौकारांसह नाबाद 111 धावा जमविल्या. पण तिला आपल्या संघाचा पराभव टाळता आला नाही. ब्रंट आणि जोन्स यांनी सहाव्या गड्यासाठी 57 धावांची भर घातली. इंग्लंडच्या डावात 24 चौकार नोंदविले गेले. ऑस्ट्रेलियातर्फे अॅलेना किंगने 44 धावात 3, गार्डनरने 54 धावात 3 तर वेरहॅमने 47 धावात 1 गडी बाद केला. इंग्लंडने पॉवर प्ले दरम्यान 62 धावा जमविताना एकही गडी गमावला नाही. इंग्लंडचे पहिले अर्धशतक 49 चेंडूत, शतक 121 चेंडूत, दीडशतक 183 चेंडूत, द्विशतक 226 चेंडूत आणि 250 धावा 277 चेंडूत फलकावर लागल्या. इंग्लंडच्या ब्रंटने आपले शतक 93 चेंडूत 9 चौकारांच्या मदतीने झळकवताना ग्लेन समवेत आठव्या गड्यासाठी अभेद्य 78 धावांची भागिदारी केली.
संक्षिप्त धावफलक – ऑस्ट्रेलिया 50 षटकात 7 बाद 282 (इलेसिपेरी 91, मुनी 33, गार्डनर 33, सदरलँड 50, वेरहॅमने नाबाद 37, हिली 13, अवांतर 11, बेल 3-85, इक्लेस्टोन 3-40, ग्लेन 1-56), इंग्लंड 50 षटकात 7 बाद 279 (नॅट स्किव्हेरब्रंट नाबाद 111, बेमाँट 60, डंकले 13, नाईट 12, कॅप्से 2, वेट 8, जोन्स 37, ग्लेन नाबाद 22, अवांतर 13, गार्डनर 3-54, किंग 3-44, वेरहॅम 1-47).









