हॉलंडवर 9 धावांनी मात, सामनावीर तस्कीन अहमदचे 25 धावांत 4 बळी, कॉलिन एकरमनची अर्धशतकी खेळी
वृत्तसंस्था/ मेलबर्न
ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत सोमवारी झालेल्या सामन्यात बांगलादेशने अवघ्या 9 धावांनी हॉलंडवर विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने निर्धारित 20 षटकांत 8 बाद 144 धावा केल्या. यानंतर विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना हॉलंडच्या खेळाडूंनी चांगलीच झुंज दिली पण त्यांना 9 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. हॉलंडचा डाव 135 धावांवर आटोपला. बांगलादेशकडून तस्कीन अहमदने 25 धावांत 4 बळी घेत विजयात मोलाची भूमिका बजावली. तोच सामनावीराचा मानकरी ठरला. या विजयासह बांगलादेश सुपर 12 च्या दुसऱया गटात गुणतालिकेत पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. तर भारत दुसऱया स्थानावर आहे.
या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक गमावली असली तरी त्यांनी सामना आपल्या नावे केला. हॉलंडने बांगलादेशला प्रथम फलंदाजी करण्याचे आव्हान दिले. प्रारंभी नजमुल होसेन व सौम्या सरकार या जोडीने 5.1 षटकांत 43 धावांची सलामी दिली. पण एका खराब चेंडूवर सरकार 14 धावांवर बाद झाला. यानंतर फलंदाजीला आलेल्या लिटॉन दास (9) व शकीब अल अहमद (7) यांनी सपशेल निराशा केली. सलामीवीर नजमुल होसेनही 25 धावा काढून बाद झाल्याने बांगलादेशची 5 बाद 76 अशी अवस्था झाली होती. अफिफ होसेनने मात्र 27 चेंडूत 2 चौकार व 2 षटकारासह 38 धावांची खेळी साकारत संघाला शतकी टप्पा गाठून दिला. त्याला नुरुल हसन (13) व मुसादेक होसेन (नाबाद 20) यांनी चांगली साथ दिल्याने बांगलादेशने 20 षटकांत 8 गडी गमावत 144 धावा जमवल्या. हॉलंडकडून मीकरेन व लीडे यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.

एकरमनची अर्धशतकी खेळी व्यर्थ
लक्ष्याचा पाठलाग करताना हॉलंडचा संघ शेवटच्या चेंडूपर्यंत हार मानायला तयार नव्हता. शेवटच्या षटकात विजयासाठी त्यांना 24 धावा हव्या होत्या. तेव्हा व्हॅन मीकरेन याने षटकार खेचत संघाच्या विजयाच्या आशा कायम ठेवण्याचा प्रयत्न केला, मात्र ते 20 षटकात सर्व विकेट्स गमावत 135 धावापर्यंतच मजल मारू शकले. त्यांच्याकडून कॉलिन एकरमनने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 48 चेंडूत 6 चौकार आणि 2 षटकार खेचत 62 धावांचे योगदान दिले. कर्णधार स्कॉट एडवर्ड (16) व मीकरेन (14 चेंडूत 3 चौकार व 1 षटकारासह 24) यांनी त्याला उत्तम साथ दिली. इतर हॉलंडच्या फलंदाजांना अपेक्षित कामगिरी साकारता आली नाही.
डावातील पहिल्याच षटकांत वेगवान गोलंदाज तस्कीन अहमदने हॉलंडला लागोपाठ दोन धक्के दिले. एकवेळ त्यांची 4 बाद 15 अशी बिकट स्थिती होती. पण एकरमनने शानदार अर्धशतकी खेळी साकारत संघाचा डाव सावरला. तो खेळपट्टीवर असेपर्यंत हॉलंडला विजयाची आशा होती पण 17 व्या षटकांत तस्कीनने त्याला बाद करत ही आशा संपुष्टात आणली. बांगलादेशचा मध्यमगती वेगवान गोलंदाज तस्किन अहमद याने उत्तम कामगिरी केली. त्याने 4 षटकात 25 धावा देत 4 विकेट्स घेतल्या. त्याला हसन महमूद याने योग्य साथ दिली. महमूदने 4 षटकात 15 धावा देत 2 विकेट्स घेतल्या.
संक्षिप्त धावफलक
बांगलादेश 20 षटकांत 8 बाद 144 (नजमुल होसेन 25, सौम्या सरकार 14, अफिफ होसेन 38, मुसादेक होसेन नाबाद 20, मीकरेन 20 धावांत 2 बळी, लीडे 29 धावांत 2 बळी).
हॉलंड 20 षटकांत सर्वबाद 135 (एकरमन 48 चेंडूत 62 धावा, स्कॉट एडवर्ड 16, मीकरेन 20, तस्कीन अहमद 25 धावांत 4 बळी, हसन मेहमुद 15 धावांत 2 बळी, शकीब अल हसन 32 धावांत 1 बळी, सौम्या सरकार 29 धावांत 1 बळी).
बांगलादेश ग्रुपमध्ये अव्वल
बांग्लादेश आता सुपर-12 मधील ग्रुप 2 च्या गुणतालिकेत 2 गुण आणि 0.450 च्या नेट रन धावगतीने अव्वल स्थानावर आहे. याचबरोबर टीम इंडियाचेही तितकेच गुण आहेत, पण नेट रन रेट कमी असल्यामुळे भारत दुसऱया स्थानावर आहे.पाकिस्तानविरुद्ध दणदणीत विजय नोंदवल्यानंतर, इतर चार संघांनी एकही सामना न खेळल्यामुळे टीम इंडिया 2 गुणांसह गट-2 गुणतालिकेत अव्वल स्थानावर होती. पण आज बांगलादेश विरुद्ध हॉलंड सामन्यानंतर गुणतालिकेत बदल झाला आहे.









