मनपा बैठकीत प्रचंड गदारोळ : महापौरांसह आयुक्त धारेवर,अनेक रस्ते बनले मृत्यूचे सापळे
पणजी : अष्टमी फेरीच्या आयोजनात झालेले गैरप्रकार आणि गैरव्यवहारांचा पाढाच वाचून विरोधी नगरसेवकांनी पणजी मनपाच्या काल शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण बैठकीत सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. त्यामुळे बैठकीत प्रचंड गदारोळ माजला. विरोधकांनी केवळ अष्टमीपुरताच विषय लावून न धरता पे पार्किंग कंत्राट, सोपो कंत्राट, स्मार्ट सिटीची कामे आदी विषयही लावून धरताना महापौर आणि आयुक्तांवर प्रश्नांची सरबत्ती केली. विरोधी नगरसेवक उदय मडकईकर व सुरेंद्र फुर्तादो हे यावेळी बरेच आक्रमक बनले होते. पे पार्किंग कराराची प्रक्रिया न करताच मुदतवाढ दिल्याचा आरोपही त्यांनी केला.
रस्ते बनले मृत्यूचे सापळे
हल्लीच हॉटमिक्स डांबरीकरण करण्यात आलेले राजधानीतील रस्ते म्हणजे वाहुतकीसाठी डोकेदुखी ठरत आहेत. वरकरणी गुळगुळीत वाटत असले तरी जागोजागी चोरकप्पेसदृष्य खळगे, ख•s आणि चरी निर्माण झाल्यामुळे या रस्त्यावरून वाहन चालवताना अपघात घडण्याची भीती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी हॉटमिक्स उखडल्याने रस्ताभर खडी विखुरली असून ती हटविण्याकडे साबांखा, मनपा किंवा स्मार्ट सिटी यापैकी एकाही संस्थेने पुढाकार घेतलेला नाही. अशी बेजबाबदार कामे करणाऱ्या कंत्राटदारांच्या कामांचे ऑडिट करण्यात यावे व तोपर्यंत त्यांना पेमेंट करू नये, अशी मागणी विरोधी नगरसेवकांनी केली. त्याचबरोबर सांत इनेज भागात रस्ते पुन्हा खोदण्यास काही नगरसेवकांनी आक्षेप घेतला.
अष्टमी फेरी गैरकारभार कल्पनातीत
तब्बल 12 दिवसांसाठी आयोजित करण्यात आलेल्या अष्टमी फेरीत तर मनपाने घातलेला गोंधळ कल्पनातीत होता. या फेरीसाठी वितरित करण्यात आलेल्या स्टॉल्स्च्या शुल्कात बेकायदेशीररित्या भरमसाठ वाढ करण्यात आली. त्याशिवाय कित्येक स्टॉल्स फुकटात वापरण्यास दिले. त्यामुळे मनपाचे लाखोंचे नुकसान झाले. मांडवीकिनारी थाटण्यात आलेल्या या फेरीत तब्बल 410 स्टॉल्स होते. परंतु तेथील विक्रेते, व्यापारी आणि ग्राहक यांच्यासाठी शौचालय वा स्वच्छतागृह यांची कोणतीही व्यवस्था करण्यात आली नव्हती, यासारखे अनेक प्रकार निदर्शनास आणून देत विरोधकांनी महापौर आणि आयुक्तांना धारेवर धरले.
अष्टमी फेरीमुळे मनपाला मिळाले 90 लाख
विरोधकांच्या आरोपांना उत्तर देताना महापौर रोहित मोन्सेरात यांनी अष्टमी फेरीच्या शुल्कात वाढ केल्यामुळे सीसीपीला तब्बल 90 लाख ऊपयांचा विक्रमी महसूल मिळाला असल्याचे सांगून शुल्कवाढीचे समर्थन केले. हा निधी आता विविध प्रभागांमधील विकासकामांसाठी वापरण्यात येईल, असेही ते म्हणाले.
मनपाचे खाजगीकरणच केलेले बरे : फुर्तादो
केवळ तीन व्यक्ती मनपा कॅबिनमध्ये बसून पणजीच्या हित, अहिताचे निर्णय घेत असून हे प्रकार असेच चालू द्यायचे असतील तर मनपाचे खाजगीकरणच केलेले बरे, असा सल्ला विरोधी नगरसेवक सुरेंद्र फुर्तादो यांनी दिला आहे. खरे तर प्रत्येक विषय/निर्णय हा मनपा बैठकीत चर्चेस येऊन त्यावर सर्वांची मान्यता घेतल्यानंतरच त्याची अंमलबजावणी होणे क्रमप्राप्त असते. परंतु सध्या तसे काहीच होताना दिसत नाही. केवळ तीनच व्यक्ती मनपा चालवत आहेत. पणजीत सध्या सोपो आकारणीचा परिसर किती आहे त्याची मोजमापणी मनपाकडे नाही. तरीही त्यांनी निविदा जारी केली आहे. अशाप्रकारे प्रत्येक गोष्टीत सावळा गोंधळ चालला आहे. त्यामुळे शेवटी मनपाचे खाजगीकरण करणे हा एकच उपाय राहतो, असे फुर्तादो म्हणाले.
पे पार्किंग कंत्राट संपल्यास तीन महिने उलटले असून अद्यापही वाहनचालकांकडून शुल्क वसुल करण्यात येत आहे. हे पैसे कुठे आणि कुणाच्या खिशात जातात? तसेच मनपा मंडळाची मान्यता न घेताच कंत्राटदाराला सहा महिन्यांची मुदतवाढ कशी दिली जाऊ शकते? असे सवाल फुर्तादो यांनी उपस्थित केले. हा एक महाघोटाळा असल्याचा आरोप त्यांनी केला व सोपो निविदा तसेच पे पार्किंग कंत्राट रद्द करण्यात यावे, अशी मागणी केली.
‘भिक नको पण कुत्रा आवर’ : मडकईकर
उदय मडकईकर यांनी बोलताना, स्मार्ट सिटी कामांच्या दर्जाबद्दल आम्ही वेळोवेळी आवाज उठविला होता, असे सांगितले. त्यावेळी विधानसभा अधिवेशन संपताच सर्व संबंधितांची बैठक आयोजित करण्याचे आश्वासन महापौरांनी दिले होते. परंतु अद्याप काहीच झालेले नाही. एवढेच नव्हे तर पुन्हा एकदा रस्ते खणण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. त्यामुळे लोकांचे हाल झालेले आहेत. व्यावसायिकांचे नुकसान झाले आहे. अशावेळी सदर कंत्राटदारांच्या कामांचे ऑडिट करण्यात यावे व तोपर्यंत त्यांना कोणतीही रक्कम देण्यात येऊ नये, असा एकमुखी ठराव घेतल्याचे मडकईकर यांनी सांगितले. स्मार्ट सिटीची कामे म्हणजे ’भिक नको पण कुत्रा आवर’ अशी झाली असल्याची टीकाही त्यांनी केली.









