हिंदू समुदाय दहशतीत : हल्ल्यात दरोडेखोरांचा सहभाग
वृत्तसंस्था/ कराची
पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील काशमोर येथे दरोडेखोरांच्या एका टोळीने हिंदू मंदिरावर रॉकेट लाँचरने हल्ला केला आहे. या दरोडेखोरांनी महिला आणि मुलांसमवेत हिंदू समुदायाच्या 30 सदस्यांना ओलीस ठेवल्याचेही वृत्त आहे. पाकिस्तानातून भारतात पोहोचलेल्या सीमा हैदरला परत पाठविण्यात न आल्यास हिंदू मंदिरांवर हल्ले करू अशी धमकी पाकिस्तानी दरोडेखोर रानो शारने काही दिवसांर्पी दिली होती.
दरोडेखोरांनी मंदिर आणि परिसरातील हिंदू समुदायाच्या घरांवर हल्ला केला आहे. दरोडेखोरांनी अंदाधुंद गोळीबार केला. या घटनेची माहिती मिळताच काशमोर-कंधकोट येथील पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली आहे.
हल्ल्यावेळी मंदिर बंदर होते. हे मंदिर बागडी समुदायाकडून संचालित केले जाते. हल्ला केल्यावर दरोडेखोरांनी पलायन केले आहे. तर पोलिसांनी संबंधित भागात शोधमोहीम हाती घेतली आहे. हल्ल्यात 8-9 दरोडेखोरांचा सहभाग असावा असा अनुमान अतिरिक्त पोलीस अधीक्षक सैम्मो यांनी व्यक्त केला आहे.
दरोडेखोरांनी रॉकेट लाँचरद्वारे डागलेल्या अस्त्राचा स्फोट न झाल्याने जीवितहानी टळल्याचे बागरी समुदायाचे सदस्य डॉ. सुरेश यांनी म्हटले आहे. पोलिसांनी समुदायाला सुरक्षा पुरवावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. याचदरम्यान सिंधच्या काशमोर आणि घोटकी जिल्ह्यांमधील बिघडत्या कायदा-सुव्यवस्थेबाबत पाकिस्तानच्या मानवाधिकार आयोगाने चिंता व्यक्त केली आहे.
पाकिस्तानात 48 तासात हिंदू मंदिरात तोडफोड होण्याची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी कराचीमध्ये शुक्रवारी रात्री 150 वर्षे जुने हिंदू मंदिर जमीनदोस्त करण्यात आले होते. विशेष म्हणजे पोलिसांच्या बंदोबस्तात हे मंदिर पाडविण्यात आले आहे.