माणूस अन् डब्यामध्ये फरक करण्यास अपयशी : परीक्षणादरम्यान झाली दुर्घटना
वृत्तसंस्था /सोल
दक्षिण कोरियात रोबोटने एका व्यक्तीचा जीव घेतला आहे. हा रोबोट डबा आणि माणूस यांच्यात फरक करू शकलेला नाही. रोबोटिक आर्ममध्ये झालेल्या बिघाडामुळे ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात आले. या रोबोटिक आर्मला डबे उचलून एका पॅनेलवर ठेवायचे होते, परंतु या रोबोटने डब्याऐवजी एका माणसालाच पकडले आहे. कर्मचारी रोबोटच्या सेंसर ऑपरेशनचे परीक्षण करत असताना ही दुर्घटना घडली आहे. यादरम्यान रोबोटिक आर्मने कर्मचाऱ्याला डबा समजून पकडले आणि ऑटोमॅटिक पॅनेलच दिशेने ढकलले, यामुळे कर्मचाऱ्याचा चेहरा अन् छातीचा भाग चिरडला गेला. संबंधित कर्मचाऱ्याला त्वरित रुग्णालयात हलविण्यात आले, जेथे त्याला मृत घोषित करण्यात आले आहे. संबंधित परीक्षण 6 नोव्हेंबर रोजी होणार होते, परंतु रोबोटच्या सेंसरमधील बिघाडामुळे परीक्षण दोन दिवस पुढे ढकलण्यात आले होते. यानंतर हे परीक्षण 8 नोव्हेंबर रोजी झाले आहे. यावेळी झालेल्या दुर्घटनेसाठी कुठल्या प्रकारचा बिघाड कारणीभूत आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी आता संबंधित उद्योगाच्या सुरक्षा व्यवस्थापकाच्या विरोधात निष्काळजीपणाचा आरोप ठेवत चौकशी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.









