अनोख्या नदीमुळे वैज्ञानिकांना कोडं
एखाद्या नदीत पाणीच नसेल तर त्यात अखेर काय आहे हे जाणून घेण्यासाठीची उत्सुकता वाढणे स्वाभाविक आहे. जगात एक अशी नदी आहे, ज्यात केवळ दगडच दगड आहेत. प्रत्यक्षात ही नदी रशियात असून या नदीत पाण्याचा एक थेंबही नाही. याच्या पात्रात केवळ दगडच दगड दिसुन येतात. या नदीत छोट्यापासून मोठे दगड देखील आहेत.

रशियातील या नदीत 10 टन वजनाचे दगड सुमारे 6 इंच खोलवर जमिनीत रुतलेले आहेत. याचमुळे येथे कुठलीच वनस्पती उगवत नाही. या नदीच्या आसपासचा परिसर मात्र वृक्षांनी नटलेला आहे. दगडांच्या या नदीला स्टोन रिव्हर किंवा स्टोन रन म्हटले जाते. या नदीत सुमारे 6 किलोमीटरपर्यंत केवळ दगडच दगड दिसून येतात.
याचा परिसर पाहिल्यास ती एकदम नदीच्या पात्राप्रमाणे वाटते. 20 मीटर छोट्या पात्रापासून ही नदी काही ठिकाणी 200 ते 700 मीटरच्या मोठ्या पात्राचे रुप धारण करते. सुमारे 10 हजार वर्षांपूर्वी उंच शिखरांवरून ग्लेशियन तुटून खाली आले असतील, यामुळे या अजब नदीची निर्मिती झाली असावी असे वैज्ञानिकांचे मानणे आहे. या नदीच्या आसपास देवदार वृक्षांचे घनदाट जंगल देखील आहे. तसेच याच्या नजीक एक वनक्षेत्र आहे. लोक या नदीला पाहण्यासाठी विविध ठिकाणांहून येत असतात.









