बालहक्क संरक्षण आयोगाने घेतली गंभीर दखल : 2017 पासून आतापर्यंत 11 प्रकरणांची नोंद
प्रतिनिधी /पणजी
जन्म झाल्यानंतर लहान (प्रामुख्याने मुली) अर्भकांना टाकून किंवा फेकून देण्याच्या घटना गोवा राज्यात वाढल्या असून त्याची गंभीर स्वेच्छा दखल गोवा राज्य बालहक्क संरक्षण आयोगाने घेतली आहे. याप्रकरणी काय कारवाई करण्यात आली त्याचा अहवाल पोलिसांसह इतर सरकारी खात्यांनी सादर करण्याचा आदेश आयोगाने बजावला आहे. मागील 2017 पासून आतापर्यंत गोव्यात 11 प्रकरणे नोंदवण्यात आली असून त्या बालकांना सुरक्षित राखण्यासाठी आयोगाने निर्देश जारी केले आहेत.
महिला बालविकास खाते, आरोग्य खाते, पोलीस खाते यांनी या प्रकरणात जातीने लक्ष घालावे आणि 4 आठवडय़ात कृती अहवाल पाठवावा, असे आयोगाने आदेशातून म्हटले आहे.
आयोगाचे अध्यक्ष पीटर बोर्जेस यांनी हे आदेश काढले असून त्यांची अंमलबजावणी करावी असे सूचित केले आहे. नुकतीच जन्मलेली मुले कुठेही कधीही, असुरक्षित ठिकाणी टाकून दिली जातात. चालू 2022 वर्षात अशा प्रकारची 4 प्रकरणे नोंद झाली असून काहींना कुत्र्यांनी, मुंग्यांनी चावल्यामुळे मृत्यू आल्याचेही आयोगाने निदर्शनास आणले आहे.
चिंताजनक, दुर्दैवी घटना
या घटना अतिशय चिंताजनक, दुर्देवी असून त्याचा विपरित परिणाम समाजावर होऊ शकतो. अशा प्रकरणात कोणती कारवाई झाली हे जनतेसमोर येण्याची गरज असून कारवाई होते हे कळल्यानंतर अशी प्रकरणे रोखता येतील, असे आयोगाने आदेशातून स्पष्ट केले आहे. अशा मुलांची संरक्षणात्मक जबाबदारी घेणे हे सर्वांचे कर्तव्य असून त्यांना संरक्षण देण्याचे काम सर्वांनी करावे, असे आयोगाने बजावले आहे.
सर्वांना कर्तव्यांची जाण हवाr
नको असलेली मुले किंवा अनैतिक संबंधातून जन्मलेली मुले टाकून देणे हा गुन्हा असून कायद्याने असे कृत्य करणाऱयांना शिक्षा होते हा संदेश जनतेपर्यंत जाण्याची गरज आयोगाने वर्तविली आहे. बालहक्क संरक्षण कायदे, घटनेतील तरतूदी, जबाबदाऱया, कर्तव्ये यांची जाण सर्वांना असायला हवी, असेही आयोगाने आदेशात नमूद केले आहे.









