अध्याय अठ्ठाविसावा
भगवंत म्हणाले, उद्धवा काहीवेळा योगाभ्यासात खंड पडल्याने किंवा योग्याला अकाली मृत्यू आल्याने योग्याचा अभ्यास अपूर्ण राहतो. आत्तापर्यंत केलेल्या योगाभ्यासामुळे त्याचा पुण्यसाठा एव्हढा जबरदस्त असतो की, त्याला हवा तेव्हढा काळ तो स्वर्गसुखाचा उपभोग घेऊ शकतो परंतु त्याला पुढील योगाभ्यास करण्यात जास्त स्वारस्य असल्याने त्याला स्वर्गातील भोगविलासांचा लवकरच कंटाळा येऊ लागतो आणि पुढील योगाभ्यास करण्यासाठी पुनर्जन्म घेण्याची इच्छा होते. सामान्य माणसाचा पुनर्जन्म केव्हा, कुठे व्हावा हे त्याच्या पूर्वजन्मातील कर्मानुसार व त्याच्या अपुऱ्या राहिलेल्या इच्छानुसार नियती ठरवत असते. ही नियती ईश्वराच्या नजरेखाली काम करत असल्याने तिला ईश्वराच्या आज्ञेनुसार योग्याला पुनर्जन्म देताना त्याच्या इच्छेचा विचार करावा लागतो. योग्याला जशी इच्छा असेल त्यानुसार त्याला हव्या असलेल्या घराण्यात त्याला पुनर्जन्म मिळतो. योग्याच्या इच्छेनुसार त्याला कुलीन संपन्न घराण्यात पुनर्जन्म हवा असेल तर तसे घडते आणि यथावकाश त्याचा अपुरा राहिलेला योगाभ्यास पुढे सुरु होतो किंवा योग्याच्या इच्छेनुसार योगसाधना करणाऱ्यांच्या कुळात त्याचा पुनर्जन्म होतो आणि त्याची योगसाधना बालपणीच पुढे सुरू होते. त्याला ह्याच जन्मात मोक्षप्राप्ती होते. योग्याच्या इच्छेनुसार होणाऱ्या पुनर्जन्माबद्दल उद्धवाला सविस्तर सांगितल्यानंतर भगवंत पुढे म्हणाले, उद्धवा योगभ्रष्ट कुणाला म्हणायचं किंवा योगभ्रष्ट योग्याची लक्षणे म्हणून काय सांगता येईल ते तुला आता सांगतो. सर्वात महत्त्वाचे लक्षण म्हणजे योग्यावर झालेल्या पूर्वसंस्कारामुळे त्याला कदापि देहाभिमान म्हणून होत नाही. त्यामुळे तो ब्रह्मसुखाने सदासंपन्न असतो. ब्रह्मसुख म्हणजे काय असे विचारशील तर असे सांगता येईल की, ब्रह्म हे सर्वव्याप्त असल्याने समोर दिसणारे जग मिथ्या आहे म्हणजे दिसत असले तरी ते खोटे आहे हे त्याच्या लक्षात आलेले असते. साहजिकच ज्या गोष्टीला अस्तित्वच नाही त्या गोष्टीपासून सुखदु:खाची प्राप्ती होणे शक्यच नाही, याची त्याला बालंबाल खात्री झालेली असते. त्यामुळे त्याला बाह्य परिस्थितीशी काहीच देणे घेणे नसल्याने तो सदैव आनंदात असतो आणि हा आनंद कोणत्याही बाह्य गोष्टीवर अवलंबून नसल्याने तो कधीही संपुष्टात येत नाही. ह्या कारणाशिवाय होणाऱ्या आनंदालाच ब्रह्मसुख म्हणतात. त्याने केलेल्या कर्माबद्दल त्याला काहीच वाटत नसल्याने त्या कर्मापासून त्याला कोणतीही अपेक्षा नसते. त्यामुळे ते कर्म त्याला कधीही बाधक होत नाही. अर्थातच करत असलेल्या कर्मातील मिथ्यत्व त्याला माहित असल्याने तो त्या कर्मापासून संपूर्ण अलिप्त असतो. इतरांना ही गोष्ट खूपच आश्चर्याची वाटते कारण कर्म करूनसुद्धा फळाची अपेक्षा करायची नाही हे आश्चर्य नव्हे तर काय असे ते समजतात पण ही काही अपूर्व गोष्ट नव्हे कारण तो नावापुरताच देहात असतो. केवळ योगाभ्यास पूर्ण करण्यापुरताच त्याने देह धारण केलेला असतो. थोडक्यात देही असून विदेही अशी त्याची अवस्था असते. उद्धव म्हणाला, भगवंता देही असून विदेही ही अवस्था माझ्या लक्षात येत नाहीये, तेव्हा ही कल्पना थोडी स्पष्ट करून सांगा. हे ऐकून देवांना उद्धवाच्या चाणाक्षपणाचे फार कौतुक वाटले. जी माणसं चाणाक्ष असतात त्यांना प्रत्येक गोष्टीतले बारकावे समजून घ्यायची इच्छा असते. ते मनातल्या मनात म्हणाले, खरोखरच उद्धवाला ब्रह्मज्ञान म्हणजे काय हे मनापासून समजून घ्यायचे आहे. त्यामुळे तो प्रत्येक गोष्ट, प्रत्येक संकल्पना समजावून घेत आहे आणि देही असून विदेही ही संकल्पना सविस्तर समजावून घ्यायला योग्य अशीच आहे. उद्धवाची उत्सुकता अधिक न ताणता ह्याला सर्व सविस्तर समजावून देऊ असा विचार करून भगवंत म्हणाले, तू अगदी योग्य मुद्यावर प्ष्टीकरण विचारलेस. मलाही देही असून विदेहीपणे राहणाऱ्या माझ्या भक्तांबद्दल, योग्यांबद्दल आदरयुक्त प्रेम वाटते.
क्रमश:








