काँग्रेसच्या आमदारांकडून सरकारचे समर्थन तर भाजप आमदारांचा हल्लाबोल
बेळगाव : पंचमसाली समाजाला आरक्षण मिळविण्यावरून झालेले आंदोलन व आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ला प्रकरणावरून विधानसभेत सत्ताधारी काँग्रेस व प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपमधील पंचमसाली नेत्यांमध्ये उभी फूट पडल्याचे गुरुवारी दिसून आले. एकीकडे भाजपमधील आमदारांनी सरकारला धारेवर धरत असताना दुसरीकडे काँग्रेसचे आमदार विजयानंद काशप्पन्नावर यांनी सरकारचे समर्थन करीत भाजपवर आरोपांचा भडिमार केला.आमदार विजयानंद काशप्पन्नावर यांनी आजवर आरक्षणासाठी झालेल्या आंदोलनाचा आढावा घेत माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी पंचमसालींना आरक्षण देणारच, असे सांगत आपल्या मातोश्रींची शपथ घेतली होती. मात्र, त्यांनी आरक्षण दिले नाही. 2ए ऐवजी 2डी चा पर्याय भाजपने समाजासमोर दिला. आपण हा पर्याय नाकारला, असे सांगत असतानाच भाजपच्या आमदारांनी आंदोलनाचा इतिहास नको, लाठीहल्ल्यावर बोला, अशी मागणी केली.
काही नेत्यांनी स्वहितासाठी पंचमसाली आंदोलनाची धुरा सांभाळली आहे. समाजाची दिशाभूल करण्यात येत आहे. आरएसएसकडून पोलिसांवर दगडफेक करण्यात आल्याचा आरोप विजयानंद यांनी करताच भाजपचे आमदार आक्रमक झाले. इतिवृत्तातून हा आरोप काढून टाकण्याची मागणी केली. त्यावेळी गदारोळ सुरू झाला. विजयानंद यांनी आरोपांचे सत्र सुरूच ठेवले. आंदोलकांवरील गुन्हे मागे घेत भाजप नेत्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. बी. वाय. विजयेंद्र यांनी आरएसएसचा उल्लेख इतिवृत्तातून काढण्याची मागणी केली.
यासंबंधी गदारोळ सुरू असतानाच मंत्री कृष्ण भैरेगौडा यांनी पंचमसाली आंदोलनाबद्दल सभागृहात निवेदन सुरू केले. माजी मंत्री सुनीलकुमार यांनी त्याला आक्षेप घेत हरकतीचा मुद्दा उपस्थित केला. तरीही सभाध्यक्षांनी याकडे दुर्लक्ष केले. त्यावेळी सभाध्यक्षांविरुद्ध घोषणाबाजी सुरू करण्यात आली. एका मुद्द्यावर दोन मंत्री निवेदन करण्याची तरतूद आहे का? असा प्रश्न भाजप नेत्यांनी उपस्थित केला. त्यावेळी विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी गृहमंत्र्यांनी निवेदन केल्यानंतर कृष्ण भैरेगौडा हे कशासाठी उभे आहेत? असा प्रश्न उपस्थित केले. गदारोळ वाढताच 2.25 वाजण्याच्या सुमारास सभाध्यक्षांनी कामकाज तहकूब केले. 4.37 वाजता पुन्हा कामकाजाला सुरुवात झाली.
सभाध्यक्षांनी कामकाज तहकूब केल्यानंतर विरोधी पक्षनेते आर. अशोक, भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र व माजी मंत्री सुनीलकुमार आदींसह तावातावाने भाजप नेते सभाध्यक्षांच्या कोठडीत घुसले. यावेळी वादावादीचा प्रसंगही घडला. नियमानुसार हरकतीचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर सभाध्यक्षांनी आपला रुलींग द्यायचा असतो. त्यानंतर पुढील कामकाज चालवायचे असते, असे सांगत सभाध्यक्षांवर पक्षपातीपणाचा आरोप करण्यात आला. यावेळी सभाध्यक्षांच्या कार्यालयाबाहेर गर्दी वाढली. वादावादी लक्षात घेऊन काँग्रेसचे सदस्यही त्यांच्या कक्षात शिरले. भोजनविरामानंतर कामकाज सुरू करण्याआधी सभाध्यक्ष व भाजप नेत्यांची बैठक झाली.
माजी केंद्रीयमंत्री बसनगौडा पाटील-यत्नाळ, विरोधी पक्षाचे उपनेते अरविंद बेल्लद यांनी सरकारला धारेवर धरले. बसनगौडा पाटील यांनी तर मुख्यमंत्री हिंदूविरोधी असल्याचा आरोप केला. ज्यांनी पंचमसाली आंदोलकांवर लाठीहल्ला केला आहे, त्या अतिरिक्त राज्य पोलीस महासंचालकांना आमचे सरकार आल्यानंतर आम्ही सोडणार नाही, असे सांगत ट्रॅक्टरना प्रवेशबंदी घालण्याचा व आंदोलकांवर लाठीहल्ला करण्याचा अधिकार या अधिकाऱ्यांना कोणी दिला? ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देणाऱ्यांवर कारवाई होत नाही. मात्र, आंदोलकांवर अमानुषपणे लाठीहल्ला करण्यात आला आहे. अतिरिक्त राज्य पोलीस महासंचालकांवर कारवाई करावी, अशी मागणी करीत त्यांना दम भरण्याचा प्रयत्न करताच गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांच्यासह काँग्रेसच्या नेत्यांनी याला आक्षेप घेतला. कर्नाटकात पुढे आम्हीच सत्तेवर येणार आहे, आमच्यावर लाठीहल्ला करणाऱ्यांवर त्यावेळी बघून घेऊ, अशी धमकी बसनगौडा यांनी दिली. केंद्रात आमचेच सरकार आहे. यासंबंधी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना आपण पत्र पाठवणार असल्याचे त्यांनी सांगितले.









