पाटपन्हाळे येथील अपघातात सातजण जखमी, १२ वर्षीय मुलगा गंभीर, रिक्षाचा चुराडा
गुहागर/वार्ताहर
दापोली तालुक्यातील पाजपंढरी येथून स्वाध्याय परिवार भक्ती फेरीसाठी गुहागर तालुक्यातील बुधल येथे जाणाऱ्या अँपे रिक्षाला चिपळूण-गुहागर मार्गावरील पाटपन्हाळे वावा या ठिकाणी कारने ठोकल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात रिक्षातील दोन लहान मुलांसह अन्य पाच जण गंभीर जखमी झाले. हा अपघात शनिवारी सकाळी ११ च्या सुमारास घडला. नववर्षाच्या पूर्वसंध्येला झालेल्या या दुदैवी घटनेने वाहनचालक व प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पाजपंढरी येथून अँपे रिक्षाचालक राजेश चुणेकर (29) हा आपल्या ताब्यातील एम.एच. ०८ ए ओ २९९७ अँपे रिक्षाने स्वाध्याय परिवाराच्या ३ सदस्यांना घेऊन गुहागर तालुक्यातील बुधल येथे स्वाध्याय परिवार भक्ती फेरीसाठी निघाले होते. दरम्यान, शृंगारतळी येथे आल्यावर बूधल येथील एका महिला सदस्याला आपल्या रिक्षामध्ये घेतले. यानंतर त्यांची रिक्षा चिपळूण-गुहागर मार्गावरील पाटपन्हाळे वावा येथे आली असता गुहागरकडून चिपळूणच्या दिशेने आपली कार घेऊन जाणारा सचिन सतीश ओक (गुहागर, 39) याची रेल्नाँल्ड क्वीड (एम.एच. ०८ एक्स ०८०९) ही कार रिक्षावर येऊन आदळली. हा अपघात इतका भीषण होता की, अँपे रिक्षाचा चुराडा झाला.
यामध्ये रिक्षातील उत्कर्ष चुणेकर (वय १२), प्रभा चुणेकर (वय ४०), चालक राजेश चुणेकर (वय २९), पंकज चोगले (वय १९), अंजली धोपावकर (बूधल, वय ६०) हे जखमी झाले. यातील सर्वांनाच पायाला, मांडीला, हाताला जबरदस्त मार बसला आहे. अनेकांची हाडेच मोडली आहेत. यातील उत्कर्ष या मुलाच्या उजव्या पायाच्या मांडीचे हाड मोडून डाव्या पायालाही लागले आहे. तो गंभीर आहे. तसेच कारचेही नुकसान झाले असून चालक सचिन ओक याच्या डोक्याला तर वडील सतीश ओक हे जखमी झाले आहेत. या सर्व जखमींना तात्काळ शृंगारतळी येथील डाँ. राजेंद्र पवार यांच्या रुग्णालयात नेण्यात आले होते. यानंतर पुढील उपचारासाठी चार रुग्णवाहिकांमधून चिपळूण विठाई रुग्णालय व लाईफ केअर येथे हलवण्यात आले. अपघातस्थळी पोलीस उपनिरीक्षक पवन कांबळे, हेड काँन्स्टेबल स्वप्नील शिवलकर, विशाल वायंगणकर, वैभव चोगले आदींनी दाखल होऊन पंचनामा केला. तसेच महामार्ग तात्काळ मोकळा केला.