वार्ताहर/ किणये
बिजगर्णी येथील प्राथमिक मराठी शाळेचे 1997-98 इयत्ता सातवीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा गेल्या दोन दिवसांपूर्वी बेळगुंदी रोडजवळील दुर्गामाता हॉल येथे झाला. या स्नेहमेळाव्याच्या माध्यमातून माजी विद्यार्थ्यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. तसेच आपल्याला शिक्षण दिलेल्या गुरुजणांचा विशेष सत्कारही या माजी विद्यार्थ्यांनी केला.
कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित गुरुजणांवर पुष्पवृष्टी करून करण्यात आली. त्यानंतर दीपप्रज्वलन आणि सरस्वती फोटो पूजन शिक्षकांच्या हस्ते करण्यात आले. 1997-98 बॅचच्या माजी विद्यार्थ्यांना शिकविलेल शिक्षक गोपाळ भास्कर, मोहन गुरव, पुंडलिक मुचंडीकर, सी. बी. गोजगेकर हे उपस्थित होते. या गुरुजणांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन माजी विद्यार्थ्यांनी सत्कार केला.
शुभांगी जाधव, विद्या कांबळे, संदीप हलकर्णीकर, भाऊराव तारीहाळकर, एकनाथ पाटील, अशोक जाधव, निंगाप्पा पाटील, प्रसाद हलकर्णीकर, विनोद जाधव, सुधीर हलकर्णीकर, विष्णू कणबरकर यांनी आपल्या भाषणातून शालेय जीवनातील विविध प्रसंग सांगितले. तसेच या गुरुजणांनी आम्हाला योग्य शिक्षण आणि जीवन जगण्यासाठी मार्गदर्शन केल्यामुळे आमच्या या बॅचमधील बरेचसे विद्यार्थी देशसेवा बजावत आहेत. काहीजण देशसेवा करून निवृत्त झालेले आहेत. तर काहीजण खासगी नोकरी करत आहेत, असेही या माजी विद्यार्थ्यांनी सांगितले. अन्नाचा कण आणि आनंदाचा क्षण केव्हाही वाया घालवू नका. तुम्ही माजी विद्यार्थी असला तरी एकमेकांना सहकार्य करीत रहा, असे पुंडलिक मुचंडीकर यांनी सांगितले. मुलांना घडविण्यासाठी शिक्षण देत असताना आम्ही विशेष काळजी घेतली. त्याचे फळ आम्हाला या माजी विद्यार्थ्यांच्या स्वरुपातून मिळाले, असे मोहन गुरव यांनी सांगितले. यावेळी इतर शिक्षकांचीही भाषणे झाली. सूत्रसंचालन रमेश भास्कर यांनी केले. राजू मोरे यांनी आभार मानले









