क्षुल्लक कारणावरून मारहाण : पोलीस स्थानकात तक्रार दाखल
बेळगाव : क्षुल्लक कारणावरून निवृत्त लष्करी जवानाला मारहाण करून त्याच्याजवळील पिस्तूल पळविल्याची घटना मंगळवारी रात्री टिळकवाडी पहिल्या रेल्वेगेटजवळील एका वाईन शॉपसमोर घडली आहे. यासंबंधी टिळकवाडी पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी चौघा जणांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त शेखर एच. टी. यांनी दिली आहे. औदुंबर भालचंद्र नायक (वय 43) मूळचे राहणार लोंढा, ता. खानापूर, सध्या रा. सरस्वतीनगर, गणेशपूर असे जखमी निवृत्त जवानाचे नाव आहे. त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहेत. औदुंबर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून प्रकाश रा. टिळकवाडी, महेश बसवाणी कोळी, रा. कंग्राळी खुर्द, सागर सदाशिव लाटकर, रा. भाग्यनगर व इतर काही जणांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे.
पहिल्या रेल्वेगेटजवळील एका वाईन शॉपसमोर ही घटना घडली आहे. औदुंबर नायक यांनी समीर मठकर, रा. वेंगुर्ला या निवृत्त जवानाच्या आर्मी अकादमीत प्रशिक्षणासाठी दहा मुले पाठविली होती. यासाठी 3 लाखाहून अधिक रक्कम दिली होती. समीर यांनी त्यानंतर औदुंबर यांना प्रतिसाद देणे बंद केले होते. अधूनमधून समीर पहिल्या रेल्वेगेटजवळील वाईन शॉपला येतो, ही माहिती मिळाल्यानंतर शनिवार दि. 10 जून रोजी समीरच्या शोधासाठी औदुंबर टिळकवाडीत पोहोचले. वाईन शॉपच्या व्यवस्थापकाकडे चौकशी करून समीरचा मोबाईल क्रमांक मागितला. आपल्याजवळ समीरचा नंबर नाही, मात्र त्याच्या पत्नीचा नंबर आहे, असे सांगत व्यवस्थापकाने एक मोबाईल क्रमांक दिला. मात्र, तो क्रमांक राँगनंबर निघाला. एका ऑटोचालकाच्या पत्नीचा तो मोबाईल क्रमांक होता. त्यावेळी तिच्या पतीने माझ्या पत्नीला का फोन करतोस? असा जाब विचारला. मंगळवारी रात्री कालच्या घटनेसंबंधी बोलायचे आहे, असे सांगत वाईन शॉपसमोर औदुंबर यांना बोलावून घेतले. तेथे लाथाबुक्क्यांनी मारहाण करून औदुंबर यांच्याजवळील आठ जिवंत काडतुसांनी भरलेले पिस्तूल पळविले आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजली असून टिळकवाडीचे पोलीस निरीक्षक दयानंद शेगुणशी व त्यांचे सहकारी पुढील तपास करीत आहेत. पोलिसांनी काही जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.









