आता 17-18 जुलैला बेंगळूरमध्ये विचारमंथन
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
महाराष्ट्राच्या राजकारणात झालेल्या उलथापालथीनंतर 13 ते 14 जुलै रोजी बेंगळूर येथे होणारी विरोधी महायुतीची बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. जेडीयूचे ज्येष्ठ नेते के. सी. त्यागी यांनी बैठक पुढे ढकलल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. बैठकीची नवीन तारीखही निश्चित करण्यात आली असून आता ही बैठक 17-18 जुलै रोजी होणार आहे.
बिहार विधानसभा आणि कर्नाटक विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनामुळे ही बैठक पुढे ढकलण्यात आल्याचे बोलले जात आहे. बिहार विधानसभेचे पावसाळी अधिवेशन 10 ते 24 जुलै दरम्यान होणार आहे. नितीशकुमार आणि तेजस्वी यादव विधानसभेच्या अधिवेशनात व्यस्त असल्याने जेडीयूने काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांना बैठक पुढे ढकलण्याची विनंती केली होती.
बिहारमधील पाटणा येथे 23 जून रोजी झालेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीत पुढील बैठक 10 जुलै रोजी शिमला येथे घेण्याचे ठरले होते. मात्र त्यानंतर शरद पवार यांनी विरोधी पक्षांच्या बैठकीचे ठिकाण आणि तारीख बदलून 13-14 जुलैला शिमल्याऐवजी बेंगळूरमध्ये होणार असल्याचे म्हटले होते. मात्र आता विरोधी पक्षांच्या बैठकीत पुन्हा एकदा नवा बदल झाला आहे. विरोधी पक्षांच्या बैठकीचे ठिकाण तेच असले तरी तारीख बदलली आहे. काँग्रेसचे सरचिटणीस वेणुगोपाल यांनीही ट्विट करत 17 आणि 18 जुलै रोजी विरोधी पक्षांची बैठक बेंगळूरमध्ये होणार असल्याचे जाहीर केले आहे. या बैठकीसाठी पाटणा येथे झालेल्या बैठकीत उपस्थित सर्व राजकीय पक्षांना निमंत्रित करण्यात आले आहे.









