कोलारमधील प्रचारसभेत काँग्रेसवर घणाघात :
प्रतिनिधी/ बेंगळूर
भ्रष्टाचारविरोधातील कारवाईमुळे काँग्रेस नेते हतबल झाले आहेत. त्यामुळे त्यांनी माझा तिरस्कार सुरू केला आहे. “मोदी तेरी कब्र खुदेगी” अशा शब्दात ते मला धमकी देत आहेत. आता माझी तुलना सापाशी करून लोकांकडे मते मागण्याचे धाडस दाखवत आहेत. भगवान शंकराच्या गळ्यात साप विराजमान आहे, हे त्यांना माहित असायला हवे. माझ्यासाठी जनता शिवशंकरासारखी आहे, असा परखड प्रत्युत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस नेत्यांना दिले.
कोलार येथे रविवारी भाजपच्या प्रचारसभेत पंतप्रधान मोदींनी काँग्रेस आणि निजदच्या घराणेशी आणि भ्रष्टाचारावरून हल्लाबोल केला. काँग्रेस नेते माझी तुलना सापाशी करत आहेत. परंतु, साप हा भगवान शंकराच्या गळ्यात शोभतो आणि माझ्यासाठी कर्नाटक व देशातील जनता भगवान शंकरासारखी आहे. काँग्रेस आणि निजद हे दिसायला दोन पक्ष असले तरी ते एकच आहेत. दोन्हीही घराणेशाहीचा पुरस्कार करतात. भ्रष्टाचारालाही खतपाणी घालतात. हे दोन्ही पक्ष दिल्लीत एकत्र राहतात. संसदेतही एकमेकांना साथ देतात. काँग्रेस-निजद युतीचे सरकार सत्तेवर असताना फक्त ठराविक कुटुंबांचा उद्धार होतो. पण, या देशातील प्रत्येक कुटुंब भाजपसाठी स्वत:चे कुटुंब असल्याप्रमाणे आहे, असे प्रतिपादन मोदींनी केले.
काँग्रेसची वॉरंटी संपली, त्यामुळेच प्रत्येक गॅरंटी खोटी
भाजप सरकारने जारी केलेल्या काही योजना काँग्रेसने बंद केल्या आहेत. हाच काँग्रेसचा खरा चेहरा आहे. त्यांच्याजवळ ‘रिव्हर्स गिअर’चे धोरण आहे. काँग्रेसची वॉरंटी संपली आहे, त्यामुळेच त्यांची प्रत्येक गॅरंटी खोटी आहे. या पक्षाने हिमाचल प्रदेशमध्ये गॅरंटी देताना सरकारच्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत प्रत्येक महिलेला 1500 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्यांनी महिलांची फसवणूक केली. तेथील महिला अद्याप या रकमेची प्रतीक्षा करत आहेत, असा टोलाही काँग्रेस नेत्यांना लगावला.
जगासाठी भारत एक मोठे आशास्थान
ते पुढे म्हणाले, अस्थिर सरकारांजवळ कोणतेही व्हिजन नाही. काँग्रेसच्या सत्ताकाळात जगाला भारताकडून कोणतीही आशा नव्हती. आता भाजप सत्तेवर आहे. जग भारताला एक मोठे आशास्थान म्हणून बघत आहे. कर्नाटकाने भाजपला पुन्हा सत्तेवर आणण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस-निजद युतीचे सरकार असताना राज्याच्या विकासाचा वेग मंदावला होता. त्यामुळे राज्याच्या विकासासाठी डबल इंजिनचे सरकार अत्यावश्यक आहे, असेही ते म्हणाले.
काँग्रेसचे इंजिन जुने
काँग्रेस हे एक जुने इंजिन आहे. परिणामी विकास थांबला. या पक्षाच्या खोट्या हमी योजना लागू होणार नाही. 2005 ते 2014 अशी 10 वर्षे खोटी आश्वासने दिली. काँग्रेसने देशातील 18 हजार गावांना वीज देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अनेक गावे विजेविना अंधारात राहिली. काँग्रेसने देशातील जनतेची फसवणूक केली आहे. आम्ही एक हजार दिवसांत 18 हजार गावांना वीजपुरवठा केला, असे ते म्हणाले.
किसान सन्मान योजनेमुळे शेतकऱ्यांना फायदा
2004 मधील निवडणुकीत केलेल्या दिलेल्या जाहीरनाम्याची पुर्तता झाली नाही. काँग्रेसने निव्वळ लोकांची फसवणूक केली. पण, आम्ही सत्तेत आल्यानंतर किसान सन्मान योजना लागू केली. याचा फायदा अनेक शेतकऱ्यांना झाला आहे. काँग्रेसने शेतकऱ्यांचा कधीच विचार केला नाही. बियाणांपासून व्यवसायापर्यंत शेतकऱ्यांचा विचार आम्ही केला आहे. पीएम किसान सन्मान योजनेद्वारे आम्ही थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पोहोचवत आहोत, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
काँग्रेस पक्ष नेहमीच 85 टक्के कमिशनचा पक्ष म्हणून ओळखला जातो. काँग्रेसचे तत्कालिन पंतप्रधानांनीच म्हटले होते की, 1 रुपयापैकी केवळ 15 पैसेच लाभार्थीपर्यंत पोहोचतात, त्यामुळे देशाचा विकास काँग्रेसकडून अशक्य आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
निजद 15 जागा जिंकून किंगमेकरची स्वप्ने पहात आहे
रामनगर जिल्ह्याच्या चन्नपट्टण मतदारसंघातील शेट्टीहळ्ळी येथील प्रचारसभेत बोलताना मोदींनी निजदवर निशाणा साधला. निजद 15 जागा जिंकून किंगमेकर बनण्याचे स्वप्न बघत आहे. निजदला दिलेले प्रत्येक मत काँग्रेसला गेल्यासारखे आहे. अशा स्वार्थी पक्षांमुळे केवळ एकाच कुटुंबाला अनुकूल होणार आहे. मात्र, राज्यातील लाखो कुटुंबे लाभापासून वंचित राहतील, अशी टिकाही त्यांनी केली.
एका दिवसात चार जिल्ह्यांत प्रचार शनिवारपासून पंतप्रधान मोदी दोन दिवसांच्या राज्य दौऱ्यावर होते. शनिवारी त्यांनी बेळगाव, बिदर, विजापूर आणि बेंगळूर जिल्हा दौरा केला होता. तर रविवारी म्हैसूर, रामनगर, कोलार आणि दावणगेरे जिल्ह्यांचा दौरा केला. सायंकाळी म्हैसूरमध्ये ते रोड शोमध्ये सहभागी झाले.









