पुणे / प्रतिनिधी :
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या 131 व्या वर्षी गणेशोत्सवात अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. गणेश चतुर्थीला मंगळवारी 19 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजून 23 मिनिटांनी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते श्रींची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. तर मंदिरावरील विद्युतरोषणाईचे उद्घाटन सायंकाळी 7 वाजता होणार असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मंगळवारी (दि. 19) प्राणप्रतिष्ठापनेपूर्वी सकाळी 8.30 वाजता मुख्य मंदिरापासून श्री हनुमान रथातून श्रींची आगमन मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्याकरिता आकर्षक फुलांचा रथ साकारण्यात आला असून, श्री हनुमानाच्या 4 मूर्ती रथावर लावण्यात येणार आहेत. प्रतिष्ठापनेनंतर उत्सवमंडपात दुपारी 12 पासून भाविकांनी श्रींच्या दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे. सायंकाळी सजावटीचे उद्घाटन करण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना निमंत्रित केले आहे.
पुढील वर्षी सन 2024 मध्ये अयोध्येतील श्रीराम मंदिराची उभारणी पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर श्रीराम मंदिराची प्रतिकृती लक्षवेधी ठरणार आहे. मंदिराच्या प्रतिकृतीचा आकार 125 फूट लांब, 50 फूट रुंद आणि 100 फूट उंच आहे. प्रतिकृतीमध्ये 24 खांब व 24 कमानी उभारण्यात आल्या आहेत. मंदिराचा मुख्य घुमट 100 फुटांपेक्षा उंच असून ध्वजासहित सुमारे 108 फूट उंच मंदिर आहे. याशिवाय मंदिराचे छोटे आणि मोठे, असे रेखीव 11 कळस आहेत.
मुख्य सभागृहात श्री गणरायाचे मखर सोनेरी रंगाच्या छटांमध्ये असून सभोवती सुशोभित कमानी आहेत. मंदिर परिसर व मार्गामध्ये 60 खांबांवर वानरसेनेच्या मूर्तींसह रामायणातील घटनांचा आढावा हा चित्र व लेखन स्वरुपात मांडण्यात आला आहे. बेलबाग चौकातून प्रवेश करताना काल्पनिक रामसेतू उभारण्यात आला आहे. तेथून भाविकांना मंदिरात प्रवेश करता येईल, हेदेखील यंदाचे आकर्षण असणार आहे. याशिवाय भगवान श्रीराम, प्रवेशद्वारावर श्री हनुमंत आणि वानरसेनेच्या वानरांच्या प्रतिकृतीदेखील लक्षवेधी ठरणार आहेत. कलादिग्दर्शक अमन विधाते यांनी सजावटीचे काम, विद्युतरोषणाइचे काम वाईकर बंधू, मंडपव्यवस्था काळे मांडववाले यांनी केली आहे.
ऋषिपंचमीनिमित्त 31 हजार महिलांचे अर्थवशीर्ष पठण
दरम्यान, बुधवार, दिनांक 20 सप्टेंबर रोजी पहाटे 6 वाजता ऋषिपंचमीनिमित्त दरवर्षीप्रमाणे 31 हजार महिला सामुदायिकरीत्या अर्थवशीर्ष पठण करणार आहेत. रात्री 10 ते पहाटे 3 वाजेपर्यंत ‘हरी जागर’च्या माध्यमातून महाराष्ट्रातील भारतीय वारकरी मंडळ व समस्त वारकरी बंधू वारकरी गजर करीत गणरायाचरणी सेवा अर्पण करणार आहेत.








