कधीच केला नाही विमानाचा प्रवास
या जगात प्रत्येक व्यक्तीला पूर्ण जगाचा प्रवास करण्याची आणि प्रत्येक देश पाहण्याची इच्छा असते. परंतु प्रत्येकाला ही इच्छा पूर्ण करणे शक्य होत नी. अनेक लोक स्वत:च्या दैनंदिन जीवनात इतके व्यग्र होतात की ते स्वत:साठी देखील वेळ काढू शकत नाहीत. परंतु एका इसमाने विमानाची मदत न घेता वर्ल्ड टूर केली आहे. त्याने जगातील प्रत्येक देश पाहिला आहे. डेन्मार्कचा नागरिक थॉर पेडर्सनने अनोखी कामगिरी केली आहे. त्याने जगातील सर्व देश म्हणजेच एकूण 203 देशांचा प्रवास केला आहे. हा प्रवास त्याने विमानाशिवाय पूर्ण केला आहे त्याने जहाज, रेल्वे आणि वाहनांमधून प्रवास केला, परंतु विमानातून त्याने प्रवास करणे टाळले आहे.
जगात संयुक्त राष्ट्रसंघाकडून मान्यताप्राप्त 195 देश आहेत, परंतु एकूण देशांची संख्या 203 आहे. व्हॅटिकन आणि पॅलेस्टाइन हे दोन देश देखील मान्यताप्राप्त आहेत, परंतु काही देश आहेत, ज्यांना पूर्ण मान्यता मिळालेली नाही आणि यात वेस्टर्न सहारा, तैवान इत्यादींचा समावेश आहे, यामुळे एकूण देशांची संख्या 203 होत असते.
सर्वात पसंतीचा देश
थॉरने स्वत:चा प्रवास सुमारे 10 वर्षांपूर्वी सुरू केला होता. 4 वर्षांमध्ये हा प्रवास पूर्ण करण्याचा त्याचा विचार होता, परंतु मधल्या काळात राजकीय उलथापालथ, कोरोना महामारीमुळे त्याला या प्रवासाकरता मोठा कालावधी लागला आहे. थॉरचा सर्वात पसंतीचा देश क्यूबा आहे. हा देश अन्य देशाप्रमाणे नाही, यामुळे या देशाचे सौंदर्य अनुभवयाचे असेल तर येथे लोकांनी लवकरात लवकर यावे. या देशात मोठ्या प्रमाणात व्हिंटेज वाहने धावत असतात. सालसा म्युझिक ऐकत लोक सिगार ओढत असतात आणि जीवनाचा आनंद घेतात असे त्याचे सांगणे आहे.









