सेन्सेक्स 2500 अंकांनी तर निफ्टी 733 अंकांनी तेजीत
वृत्तसंस्था/ मुंबई
एक्झिट पोलमध्ये बऱ्याचशा न्यूज चॅनेल्सनी मोदी हेच पुन्हा निवडून येणार अशा प्रकारचा अंदाज दिल्याने निकालाच्या एक दिवस आधी सोमवारी शेअर बाजार नव्या विक्रमी स्तरावर बंद होण्यामध्ये यशस्वी झाला आहे. सेन्सेक्स 2507 अंकांनी तर निफ्टी 733 अंकांनी वधारत बंद झाला. याच दरम्यान सोमवारी गुंतवणूकदारांच्या कमाईत 12 लाख कोटी रुपयांची भर पडली होती.
सोमवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 2507 अंकांनी दमदारपणे वाढत 76468 अंकांवर बंद झाला. दुसरीकडे राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टी निर्देशांकदेखील 733 अंकांनी वाढत 23263 अंकांवर बंद झाला. निफ्टीमधील सर्व क्षेत्रातील निर्देशांक उत्तम तेजी दर्शवित होते. मिडकॅप 100 3 टक्के, निफ्टीतील ऑटो निर्देशांक 2.58 टक्के, एफएमसीजी निर्देशांक 1 टक्का तेजीसोबत बंद झाला.
फायनान्शियल सर्व्हिसेसचा निर्देशांक 4.29 टक्के इतक्या दमदार तेजीसह बंद झाला होता. अदानी पोर्टस्, एनटीपीसी, एसबीआय, पॉवर ग्रीड, ओएनजीसी, अदानी एंटरप्रायझेस आणि श्रीराम फायनान्स या समभागांमध्ये दमदार तेजी पहायला मिळाली. तर दुसरीकडे आयशर मोटर, एलटीआय माईंड ट्री, एचसीएल टेक, एशियन पेंटस्, सनफार्मा, ब्रिटानिया आणि डॉ. रे•ाrज लॅब यांचे समभाग घसरणीत होते. सेन्सेक्समधील 30 पैकी 25 समभाग तेजीत होते. गुंतवणूकदारांच्या मालमत्तेमध्ये सोमवारी 12लाख कोटी रुपयांची भर पडली होती. 4,12,12,881 कोटी रुपये इतके बाजार भांडवलमूल्य शुक्रवारी होते, जे सोमवारी वाढून 4,23,71,233 कोटी रुपयांवर पोहोचले. सेन्सेक्स सकाळी 2621 अंकांच्या तुफानी तेजीसोबत 76,583 वर तर निफ्टी 807 अंकांच्या उसळीसह 23337 अंकावर खुला झाला होता.
याच दरम्यान शेअर बाजारात बँक निफ्टी निर्देशांकाने 4.26 टक्के इतकी बंपर तेजी अनुभवत 51000 चा स्तर पार केला होता. सार्वजनिक क्षेत्रातल्या कंपन्यांच्या समभागांनी सोमवारी चमकदार कामगिरी करत गुंतवणूकदारांना खूष केले. यामध्ये भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमीटेड, कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, बीईएमएल लिमीटेड, इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन, हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमीटेड, रेल विकास निगम, इरकॉन, भारत हेवी इलेक्ट्रिकल्स, राईटस् लिमीटेड, आयआरसीटीसी, कोचिन शिपयार्ड, भारत डायनामिक्स आणि मजगाव डॉक या समभागांनी मजबूत कामगिरी नेंदविली होती.








