मित्राने दिलेले चॅलेंज स्वीकारले
अनेक बॉडीबिल्डर भरभक्कम वजन उचलणे आणि मोठी वाहने खेचण्याचे विक्रम करत असतात. परंतु एखाद्या दिव्यांग व्यक्तीसाठी असे करणे जवळपास अशक्य असते. परंतु अलिकडेच एका दिव्यांग व्यक्तीने व्हिलचेअरवर असतानाही केलेला विक्रम पाहता सर्वजण थक्क झाले आहेत.

डेव्ह वॉल्श यांनी स्वत: व्हिलचेअरला खिळलेले असूनही 10 टन वजनी ट्रक खेचून जागतिक विक्रम नोंदविला आहे. हे वजन मागील विक्रमाच्या तुलनेत 5 पट अधिक होते. 36 वर्षीय डेव्ह यांना 2014 मध्ये मल्टिपल स्केलेरोसिस आजाराचे निदान झाले होते. हा आजार सेंट्रल नर्व्हस सिस्टीमशी निगडित अवस्था असून याला एन्सेफेलोमाइलायटिस म्हणूनही ओळखले जाते. या आजारामुळे त्यांचे पाय निकामी ठरले होते, तसेच हिंडण्यासाठी ते पूर्णपणे व्हिलचेअरवर अवलंबून होते.
2012 पासून मी स्ट्राँगेस्ट मॅनशी निगडित स्पर्धांमध्ये सहभागी होत राहिलो, देशातील अनेक उच्चस्तरीय स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. परंतु आजाराचे निदान होताच मला नैराश्याने गाठले होते. या नैराश्यातून बाहेर पडण्याची गरज असल्याचे मला जाणवत होते. तेव्हाच 2017 मध्ये क्रीडाप्रकारांमधील डिसेबल्ड सेक्शन पाहिला आणि यात सामील झालो आणि त्यानंतर कधीच मागे वळून पाहिले नसल्याचे डेव्ह यांनी सागितले आहे.
इंग्लंडच्या चिप्पनहॅम येथे राहणारे डेव्ह यांना त्यांचा एक मित्र प्रशिक्षण देत होता. या मित्राने डेव्ह यांना ट्रक खेचण्याचे चॅलेंज दिले होते. हे आव्हान स्वीकारून ते मी पूर्ण करून दाखविल्याचे डेव्ह यांनी सांगितले आहे. 10 टन वजनी ट्रक खेचत गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड स्वत:च्या नावावर करण्यास मी यशस्वी ठरलो. पूर्वीचा विक्रम दोन टन वजनाचा होता. मला 17 टन वजनी ट्रक खेचायचा होता, परंतु माझ्या शरीरामुळे हे शक्य झाले नाही. जगातील सर्वात मजबूत दिव्यांग व्यक्तीचा मान मिळविण्याचे माझे लक्ष्य आहे, मग 20 टन वजनी ट्रक खेचण्यासाठी प्रशिक्षण घेणार असल्याचे डेव्ह यांनी सांगितले आहे.









