गुहागर :
जिल्ल्यातील कासव संवर्धन मोहिमेमध्ये गुहागर सर्वाधिक पुढे आहे. आतापर्यंत सर्वाधिक कासवांची अंडी संरक्षित करण्याबरोबर सर्वाधिक कासवांची पिल्ले समुद्रामध्ये सोडण्यात आली आहेत. मात्र यावर्षी याचा ना प्रचार-ना प्रसार करण्यात आला. आपल्याला कोणतीही वेळ देण्यात आली नसल्याचे सांगत सध्या गुहागरच्या पर्यटनाचा भाग ठरलेल्या या विषयाकडे कांदळवन विभागाने दुर्लक्ष केलेले दिसत आहे. या विभागाच्या अलिप्तपणामुळे पर्यटनात्मक दृष्ट्या गुहागरला याचा फटका सहन करावा लागत आहे.
गुहागरमध्ये कासव संवर्धनाची सुरुवात विश्वास खरे यांनी केली होती. कासवांची अंडी सुरक्षित स्थळी ठेवून त्यामधून बाहेर पडणारी ऑलिव्ह रिडले ही कासवाची पिल्ले समुद्रामध्ये सोडण्याचा उपक्रम त्यांनी हाती घेतला होता. या अगोदर वेळास येथे कासव संवर्धन व तेथील स्थानिक मंडळींनी कासव महोत्सव सुरू केले होते. मात्र हळूहळू गुहागरमध्ये कासवांची अंडी मिळण्याचे प्रमाण वाढू लागले. वनविभागाने या विषयाकडे लक्ष केंद्रीत केले आणि आज रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वाधिक कासव संवर्धन केंद्र ठरले आहे. एकाचवेळी दोनशे ते तीनशे कासव पिल्लांचा जन्म होताना दिसून येत आहे.
- गेली ३ वर्षे वनविभागाकडून संवर्धन
यामुळे गेली ३ वर्षे वनविभागाने या कासव संवर्धनाबरोबर याचा सर्वाधिक लाभ गुहागरातील पर्यटनाला व्हावा, यासाठी प्रयत्न सुरू केले. कासव संवर्धनातील सर्व नियम पाळत अंड्यांमधून बाहेर येणाऱ्या पिल्लांना सूर्योदयापूर्वी व सूर्यास्तानंतर सोडण्याचा उपक्रम सुरू केला. यासाठी मोठ-मोठे फलक लावून याचा लाभयेथील पर्यटकांना दिला. मात्र यावर्षीची चित्र वेगळेच पहावयास मिळत आहे. वेळास कासव महोत्सवासाठी अधिक कल दिसून येत आहे. यामुळे सर्वाधिक कासव पिल्ले सोडणाऱ्या गुहागरकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे.
- कांदळवन विभागाचे अधिकारी अद्याप हजर नाहीत
कासव संवर्धनाचे सर्व कामकाज यावर्षी कांदळवन विभागाकडे गेले आहे. यामुळे वनविभागाची भूमिका यावर्षी संपुष्टात आली आहे. तरीही गेल्या १५ वर्षांच्या अनुभवावर व येथील कासव संरक्षकांच्या मदतीने ४ एप्रिलपर्यंत ३३९ घरट्यांमधून तब्बल ३३,२३४ एवढ्या सर्वाधिक कासव अंड्यांचे संरक्षण करण्यात आले आहे. त्यामधून १२,९६८ नवजात कासव पिल्ले समुद्रामध्ये सोडण्यात आली आहेत. यावर्षीपासून कांदळवन विभागाचे जिल्ह्याचे प्रमुख किरण ठाकुर यांच्याकडे जबाबदारी आहे. गुहागरसाठी नियुक्त केलेले अधिकारी अद्याप हजर झालेले नाहीत. यामुळे वनविभागाच्याच वनरक्षकांना केवळ लक्ष ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत.
- वेळ निश्चित करण्याची मागणी
या कासव संवर्धनातून पर्यटनाला जोड देण्यासाठी कोणताच प्रचार- प्रसार यावर्षी केलेला नाही. उलट गुहागरच्या समुद्रावर एका पर्यटकाने मोठ्या प्रमाणात कासव पिल्ले सोडताना व ते पाहण्यासाठी हजर स्थानिक ग्रामस्थ व पर्यटकांचा व्हिडीओ केल्याने एका व्यक्तीचा चांगलाच पारा चढलेला दिसून आला. वेळास येथे कासव पिल्ले सोडण्यासाठी वेळ दिली गेली आहे. गुहागर येथे कोणतीही वेळ दिलेली नाही. यामुळे जेव्हा पिल्ले बाहेर येतील, तेव्हा तातडीने समुद्रात सोडून द्या, अशी समज येथील काहींना दिली असल्याची समजते. यामुळे सर्वाधिक कासव संवर्धन केले जात असताना असा दुजाभाव का दाखवला जातो, असा सवाल केला जात असून गुहागरसाठीही कासव पिल्ले सोडतानाची वेळ निश्चित करण्यासाठी कांदळवन विभागाने लक्ष द्यावे, अशी मागणी पर्यटकांतून होत आहे.
- स्थानिकांसह पर्यटकांना लाभमिळण्यासाठी नियोजन करू
कासव संवर्धनामध्ये सूर्यादय व सूर्यास्तानंतर कासव पिल्ले सोडण्याचे सांगण्यात आले आहे. मात्र स्थानिकांसह पर्यटकांना याचा लाभ व्हावा, यासाठी नियोजन करु, असे कांदळवन अधिकारी किरण ठाकुर यांनी सांगितले.








