तामिळनाडूतील कोइम्बतूर शहरात अलिकडेच पडलेल्या पावसादरम्यान नजरेस पडलेल्या एका जीवामुळे लोक अवाक् झाले. तसेच हा जीव पाहून त्यांना भीतीही वाटली. सर्वसाधारपणे कोब्रा साप होता काळ्या किंवा करड्या रंगाचा असतो. परंतु हा कोब्रा पूर्णपणे पांढऱ्या रंगाचा होता.
पांढऱ्या रंगाच्या कोब्राला शास्त्राrय भाषेत अल्बीनो कोब्रा म्हटले जाते. अशाप्रकारचा कोब्रा दिसणे अत्यंत दुर्लभ असते. सर्वसाधारपणे अशाप्रकारचा कोब्रा साप दिसून येत नाही. परंतु जोरदार पाऊस पडत असल्याने हा साप स्वत:च्या आश्रयस्थानातून बाहेर पडला असावा. कोइम्बतुरमध्ये हा साप 3 मे रोजी दिसून आला आहे.

वाइल्डलाइफ अँड नेचर कॉन्झर्व्हेशन ट्रस्टच्या तज्ञांनी हा कोब्राला पकडून जंगलात सोडले आहे. हा कोब्रा सुमारे 5 फूट लांबीचा होता. याला अल्बीनो इंडियन कोब्रा म्हटले जाते. तसेच स्पेक्टॅकल्ड कोब्रा असेही याला संबोधिण्यात येते. हा चार मोठ्या सापांच्या प्रजातींपैकी एक आहे. भारतात कोब्राच्या दंशामुळे अनेक लोकांचा मृत्यू होत असतो.
अल्बीनो म्हणजेच पांढऱ्या रंगाचा असणे एक जेनेटिक स्थिती असून यात त्वचेत मिलेनिन तयार होत नाही. मिलेनिनमुळे वेगवेगळ्या रंगाची त्वचा दिसून येत असते. आईवडिलांकडून मिलेनिनची गुणसुत्रे योग्यप्रकारे मुलामध्ये हस्तांतरित न झाल्यास अल्बीनोचा प्रकार निर्माण होत असतो.
अल्बीनो म्हणचेच पांढऱ्या रंगाच्या जीवांचे डोळे लाल किंवा गुलाबी रंगाचे असतात. त्यांची त्वचा सूर्यकिरणे सहन करू शकत नाही. बहुतांश जीवांसाठी अल्बीनो असणे त्रासदायक असते. पांढऱ्या रंगामुळे शिकारी या जीवांना सहजपणे शोधू शकतो.
अनेक अल्बीनो जीव आयुष्याच्या प्रारंभीच मारले जातात. हा धोका अल्बीनो कोब्राच्या पिल्लांनाही असतो. कोइम्बतूरमध्ये मिळालेला अल्बीनो कोब्राची वाढ पूर्णपणे झाली आहे. अल्बीनो कोब्रा अत्यंत दुर्लभ असल्याने त्याला वाचविणे आवश्यक होते. जर त्याने एखाद्याला दंश केला असता तर संबंधिताचा जीव धोक्यात सापडला असतो. अशाप्रकारच्या सापांना पकडण्यासाठी मोठा सराव आणि प्रावीण्याची गरज असते असे डब्ल्यूएनसीटीच्या तज्ञांनी सांगितले आहे.









