नैसर्गिक वैभव असलेली वनराई संवर्धनाची गरज : विविध वनौषधीसाठी प्रसिद्ध
वार्ताहर/गुंजी
गुंजी गावाचे नैसर्गिक वैभव असलेली वनराई ही उंचच उंच गगनाला भिडणाऱ्या वृक्षांची वनराई म्हणून जशी ओळख आहे. तशीच ती विविध वनौषधी वृक्षवल्लीने भरलेली, मधमाशांच्या पोळ्dयांनी ओतप्रोत असलेली आणि अशोक वृक्षासारख्या लालभडक फुलांच्या पुष्पगुच्छांनी बहरलेली म्हणून ओळखली जाते. मार्च, एप्रिल महिन्यात वनराईतील आम्रवृक्षांना मधुर आंब्यांचा बहर येतो तर त्यांच्या फांद्यावरती लटकलेली शेकडो मधमाशांची पोळी पाहणाऱ्याला अचंबित करतात. याच काळात या वनराईच्या गर्द हिरवळीत झाकोळलेला अशोक वृक्ष आपल्या लालबुंद फुलांच्या पुष्पगुच्छांनी मोहरून जात असल्याने नागरिकांचे लक्ष वेधून घेतो. (येथील ग्राम्य भाषेत त्याला आक्षीचे झाड म्हणतात.) सदर फुले ही अत्यंत मोहक आणि आकर्षक असल्याने त्यांचा शिमगोत्सवात आरास करण्यासाठी देखील वापर होत असे.
सध्या येथील दुर्मीळ अशोक वृक्ष बहरला असून, सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. पूर्वी या वनराईत सहज आणि सर्वत्र दिसणारा हा वृक्ष दिवसेंदिवस दुर्लभ होत चालला आहे. काही वर्षांपूर्वी शेकडोच्या संख्येने असलेले हे वृक्ष आता केवळ हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच शिल्लक असल्याने भविष्यात वनराईचे हे विलोभनीय आगळे वेगळे वैभव लोप पावणार की काय अशी शंका वाटू लागली आहे. त्याकरिता या वृक्षांचे आणि वनराईचे गतवैभव प्राप्त करण्यासाठी अरण्य खात्याने या वृक्षांचे संवर्धन करण्याची गरज आज गावकऱ्यांबरोबरच निसर्गप्रेमीतून व्यक्त होत आहे. याविषयी येथील जुने जाणते आणि गावचे मुख्य पंच राजाराम देसाई आणि सामाजिक कार्यकर्ते दिपकराव देसाई यांनी याबद्दल विस्तृत माहिती दिली.
अशोक वृक्षाचे संवर्धन होणे गरजेचे
गुंजी वनराई ही गावाला दिलेली नैसर्गिक देणगी आहे. सदर वनराई गावच्या उत्तर, पश्चिम दिशेने व्यापली असून ऐन उन्हाळ्dयातही गावाला गारवा देते. वनराईत नानाविध प्रकारचे पशुपक्षी आणि उंचच उंच आम्रवृक्ष आहेत. त्याचबरोबर या वनराईत असलेला आकर्षक आणि विलोभनीय पुष्पगुच्छांनी आकर्षित करणारा अशोक वृक्ष मानवी चुकांमुळे लुप्त पावत चालल्याचे दु:ख वाटते. त्यामुळे त्याचे संवर्धन होणे गरजेचे आहे.
– राजाराम देसाई
वनराईची अशोक वन म्हणूनच ओळख
गुंजी वनराई हे एक संरक्षित वन असून, पूर्वी या वनराईत हजारोच्या संख्येने अशोक वृक्ष होते. अशी चर्चा जुन्या जाणत्यात आहे. त्यामुळेच या वनराईतील बहरलेले अशोक वृक्ष पाहून तत्कालीन व्हाईसरॉयने संरक्षित वन म्हणून जाहीर केल्याची नोंद आहे. वनराईला पूर्वी अशोक वन म्हणूनच ओळखले जात होते. दीड दशकापूर्वी तत्कालीन वनाधिकारी एस. एस. निंगाणी यांनी कुतूहल निर्माण करून सदर प्रजातीचे संरक्षण व संवर्धन करणे गरजेचे आहे.
– दीपकराव देसाई











