सोशल मीडिया माध्यमातून लक्ष वेधण्याचा प्रयत्न
बेळगाव : बेळगाव शहरातील रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. सर्वत्र खड्डे आणि पावसाच्या पाण्याची भरलेली डबकी अशी काही अवस्था ठिकठिकाणी दिसत असल्याने युवावर्गाने आपल्या माध्यमातून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. बेळगावमधील खड्ड्यांवर आधारित रॅपसाँग तयार करण्यात आले असून सध्या हे गाणे सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रॅपसाँगद्वारे समस्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे ही काही पहिलीच वेळ नाही. मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीतील खड्ड्यांवर भाष्य करताना ‘सोनू, तुझा माझ्यावर भरवसा नाय काय?’ हे गाणे तीन-चार वर्षांपूर्वी सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. त्यानंतर बेळगावमधील तरुणांनीही अशाच पद्धतीचे खड्ड्यांमध्ये बोटिंग करून गाणे तयार केले होते. त्यामुळे प्रशासनाला तातडीने दुरुस्तीचे काम करावे लागले होते. सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल असलेल्या गुलाबी साडी या गाण्यावर आधारित बेळगावचे खड्डे असे रॅपसाँग तयार करण्यात आले. वरुण कारखानीस व त्यांच्या टीमने बेळगावच्या खड्ड्यांबाबत रॅपसाँग तयार केले आहे. शहरातील खड्डे व त्यांच्यामुळे नागरिकांना येत असलेल्या समस्या याबाबत या रॅपसाँगमध्ये भाष्य करण्यात आले आहे. त्यामुळे आता तरी प्रशासनाला जाग येणार का? असा प्रश्न विचारण्यात येत आहे.









