वृत्तसंस्था / नवी दिल्ली
समान नागरी संहितेसंबंधी सूचना पाठवाव्यात, या केंद्रीय कायदा आयोगाच्या सूचनेला देशभरातून मोठा प्रतिसाद मिळाला आहे. आयोगाकडे आतापर्यंत एकंदर 46 लाख सूचना आल्या आहेत. आता आयोग या सूचनांची छाननी करणार असून नंतर काही समाजघटकांचे नेते, विविध क्षेत्रांमधील तज्ञ आणि काही मान्यवर व्यक्ती यांच्याशी आयोग प्रत्यक्ष चर्चा करण्याची शक्यता आहे. त्यानंतर आयोग केंद्र सरकारला आपला अहवाल आणि समान नागरी संहितेचे प्रारुप सादर करणार आहे. येत्या दोन महिन्यांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण करुन समान नागरी कायद्याच्या पुढील प्रक्रियेला प्रारंभ करण्यात येण्याची शक्यता आहे. येत्या काही महिन्यांमध्ये या कायद्याचे विधेयक संसदेत मांडले जाईल. ते दोन्ही सभागृहांमध्ये दोन तृतियांश बहुमताने संमत झाल्यानंतर ही संहिता लागू करण्यात येईल.









