बोरगाव पोलिसांकडून आठ जणांवर गुन्हा दाखल : सहा मोटार सायकलसह पावणे चार लाखांचा मुद्देमाल जप्त
प्रतिनिधी/ सातारा
तालुक्यातील रामकृष्णनगर येथे बेकायदेशीररित्या सुरू असलेल्या जुगार अड्यावर बोरगाव पोलिसांनी छापा टाकला. यावेळी 8 जणांना ताब्यात घेत त्यांच्याकडून सहा मोटार सायकल, जुगाराचे साहित्य असा 3 लाख 73 हजार 500 रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
बोरगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी, रामकृष्णनगर येथील मंदिराच्या पाठीमागे काहीजण जुगाराचा खेळ खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र तेलतुंबडे यांनी या ठिकाणी छापा टाकला. यावेळी गणेश कारंडे (रा. अतीत ता. सातारा), भानुदास मसू कुऱ्हाडे (रा. रामकृष्णनगर ता. सातारा), नंदकुमार उत्तम पवार (रा. बांबवडे ता. पाटण), राजेंद्र सुतार (रा. शिरगाव ता. कराड), विष्णु कोळेकर(रा. काशीळ), प्रदीप निंबाळकर (रा. तुकाईवाडी ता. सातारा), लहू मोरे (रा. चिंचनेर निंब ता. सातारा), तानाजी माने(रा. काशीळ ता. सातारा) हे जुगार खेळाताना दिसून आले. त्यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून 17 हजार रूपये रोख, मोबाईल हॅडसेट, तसेच सहा मोटार सायकलसह सुमारे 3 लाख 73 हजार 500 रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.








