बेळगाव : केएलएस पब्लिक स्कूल पिरनवाडी येथील जंगल भागात आढळलेल्या जखमी सशाला फेसबुक फ्रेंड सर्कलचे प्रमुख संतोष दरेकर यांनी जीवदान दिले.
शाळेचे शिक्षक विनायक लोकूर यांनी एक ससा जखमी अवस्थेत आढळल्याची माहिती दिल्यांनतर संतोष दरेकर यांनी तातडीने बचावासाठी घटनास्थळी धाव घेतली. केएलएस पब्लिक स्कूलच्या प्राचार्या शालिनी संक्रोनी यांची भेट घेतली. हा ससा प्रथम शाळेतील विद्यार्थ्यांनी पाहिला आणि त्यांनी लगेचच त्यांच्या शाळेतील शिक्षकांना याची माहिती दिली. सशाचा कुत्र्यांनी चावा घेतला होता आणि ससा कुत्र्यांपासून सुरक्षेसाठी शाळेच्या मोकळ्या मैदानात घुसला आणि एका जागी बसून होता. कर्मचाऱ्यांनी ताबडतोब ससा घेतला आणि प्राथमिक उपचार म्हणून त्याच्या जखमा साफ केल्या. त्यानंतर मुख्याध्यापकांनी दिलेल्या शाळेतील महांतेशनगर बेळगाव येथील शासकीय पशुवैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. रुग्णालयात पोहोचल्यावर पशुवैद्यकीय डॉक्टरांनी तातडीने उपचार केले. त्यानंतर ससा वनविभागाकडे सुपूर्द करण्यात आला. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी केएलएसचे विद्यार्थी, व्यवस्थापन, शिक्षक आणि कर्मचारी यांच्या कार्याचे कौतुक केले.









