कराड :
दि कराड आर्किटेक्टस् अॅण्ड इंजिनिअर्स असोसिएशनतर्फे दिला जाणारा सर एम. विश्वेश्वरय्या पुरस्कार येथील नगरपालिकेचे निवृत्त अभियंता अशोक रंगराव पवार तथा ए. आर. पवार यांना जाहीर करण्यात आला आहे. सर एम. विश्वेश्वरय्या यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सोमवारी, 15 रोजी सायंकाळी 6 वाजता अभियंता दिन कार्यक्रमात ए. आर. पवार यांना ‘विश्वेश्वरय्या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. येथील वेणूताई चव्हाण स्मारक भवनमध्ये कार्यक्रम होणार असल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष मिलिंद पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी असोसिएशनचे उपाध्यक्ष मोहन चव्हाण, सचिव अॅड. राजेंद्र जाधव, खजिनदार लक्ष्मण पांढरपट्टे तसेच संचालकांची प्रमुख उपस्थिती होती.
पुरस्कार वितरण कार्यक्रमाला सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. आमदार डॉ. अतुलबाबा भोसले व आमदार मनोज घोरपडे यांचीही उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमात नितीश प्रमोद बेरी हे कराडमध्ये 96 कोटी रूपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलाचे प्रेझेंटेशन सादर करणार आहेत. हा प्रकल्प शहराला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्रीडा नकाशावर नेईल, असा विश्वास संघटनेने व्यक्त केला.
कराड आर्किटेक्टस् अॅण्ड इंजिनिअर्स असोसिएशन 1992 साली स्थापन झालेली बांधकाम क्षेत्रातील वास्तुविशारद, अभियंते आणि तांत्रिक तज्ञांची संघटना आहे. स्थापनेपासूनच ही संस्था बांधकाम क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान, नवीन संकल्पना, कामगार कल्याण, प्रशिक्षण शिबिरे व तांत्रिक मार्गदर्शनाच्या माध्यमातून कार्यरत आहे. शहर व परिसरातील विकासकामांमध्ये या संस्थेने सातत्याने योगदान दिले आहे. तांत्रिक ज्ञानवर्धन, सामाजिक उपक्रम आणि बांधकाम क्षेत्रातील शिस्तबद्ध प्रगती यासाठी असोसिएशनचे प्रयत्न उल्लेखनीय ठरले आहेत.
यावेळी असोसिएशनचे संचालक अमित उंब्रजकर, दिग्विजय जानुगडे, धैर्यशील यादव, अधिकराव पवार, विक्रमसिंह पाटील, राज जगताप, विनायक करडे, अमोल जगताप, संदीप देवकर उपस्थित होते.
ए. आर. पवार हे कराडच्या स्वच्छता चळवळीत झोकून दिलेले, पर्यावरण क्षेत्रात काम करणारे व्यक्तिमत्व आहे. सुमारे 37 वर्षे पालिकेत त्यांनी काम पाहिले असून नगरअभियंता, आरोग्य व जलनि:स्सारण विभागात मोठे योगदान दिले आहे. कराड पालिकेला महत्वपूर्ण वॉटर प्लस मानांकन व ओडीएफ प्लस प्लस मानांकन मिळवून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. आरोग्य अभियंता म्हणून काम करताना त्यांनी स्वच्छतेसाठी काम केले. शहर प्लास्टिकमुक्त करण्याची मोहीमही त्यांनी सतत राबवली आहे. निवृत्तीनंतर लहान मुलांसाठी चिल्लर पार्टी चित्रपट चळवळ त्यांनी सुरू केली आहे. शहरात मियावाकी जंगल निर्मितीसाठी त्यांनी योगदान दिले आहे. त्यांचे स्वत:चे घर शून्य कचरा घर असून फूडवेस्टपासून त्यांनी घरगुती बायोगॅस प्रकल्प उभारला आहे.








