शतकोत्तर रौप्यमहोत्सव कार्यक्रमाच्या निमित्ताने मराठी शाळेचा कायापालट
वार्ताहर/कणकुंबी
कणकुंबी येथील उच्च प्राथमिक मराठी शाळेला 129 वर्षे पूर्ण झाली आहेत. सव्वाशे वर्षात या शाळेने हजारो विद्यार्थी घडवले आहेत. या शाळेचे अनेक विद्यार्थी उच्च पदावर पोहोचले. ऋणातून मुक्त होण्यासाठी माजी विद्यार्थी कणकुंबी शाळेचा शतकोत्तर रौप्यमहोत्सव साजरा करण्यासाठी कंबर कसली आहे. शतकोत्तर रौप्यमहोत्सवानिमित्त शाळा सुधारणा कमिटी आणि माजी विद्यार्थ्यांनी सुमारे 10 लाख रुपये खर्च करून शाळेचा कायापालट करण्याचे काम हाती घेतले आहे. त्या निमित्ताने शाळेच्या चार वर्ग खोल्यांचे छप्पर, खिडक्या, दरवाजे नव्याने करण्यात आले आहेत. शाळेचे रंगकाम केले आहे. वर्ग खोल्यामध्ये पंखे व बल्प बसविले आहे. विद्यार्थ्यांसाठी पटांगण, सांस्कृतिक कार्यक्रमासाठी नवीन स्टेज बनवणे अशी विविध विकासकामे सुरू आहेत.
यासाठी कणकुंबी माउली देवी विश्वस्त मंडळ 2 लाख रुपये, लोककल्प फाऊंडेशनद्वारे शाळेच्या रंग कामासाठी 2 लाख रुपये, साईप्रसाद सडेकर 1 लाख रुपये, मूळचे कणकुंबी व सध्या मुंबईमध्ये स्थायिक झालेले उद्योजक विष्णू महादेव नाईक 51 हजार देणगीदाखल दिले आहेत. कणकुंबी ग्रामस्थांकडून 40 हजार रुपयांची मदत केली आहे. या व्यतिरिक्त माजी विद्यार्थी, शिक्षण प्रेमी सढळ हस्ते मदत करत आहेत. येत्या शिमगोत्सव दरम्यान शाळेचा शतकोत्तर रौप्यमहोत्सव आयोजित करून सर्व माजी विद्यार्थ्यांना व गुरुजनांना कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्रित आणण्याचा प्रयत्न चालविला आहे. यासाठी शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष उमेश गावडे, उपाध्यक्षा गौरी गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व एसडीएम कमिटी तसेच माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष अरुण गावडे, उपाध्यक्ष संजय नाईक व बबन नाईक, खजिनदार महेश नाईक व गोपाळ नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली माजी विद्यार्थी व ग्रामस्थ कामाला लागले आहेत.
विकासांसाठी सर्वजण एकवटले
शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक एस. डी. मुल्ला या संदर्भात दि. 6 ऑक्टोबर रोजी एसडीएम कमिटी, सर्व माजी विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ व देवस्थान कमिटी यांची संयुक्त बैठक घेऊन शाळा विकास आणि शतकोत्तर रौप्यमहोत्सवा संदर्भात चर्चा घडवून आणली. यावेळी श्री माउली देवी विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष बबन दळवी, उपाध्यक्ष राजाराम गावडे व इतरांनी आर्थिक सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रम नियोजनासाठी एसडीएम कमिटी, माजी विद्यार्थी, देवस्थान कमिटी, पालक, ग्रामस्थ एकवटले आहेत.









