जगाची लोकसंख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे. दिवसेंदिवस ती आणखी वाढतच आहे. नुकतीच तिने 800 कोटीची पातळी गाठली असून इतक्या लोकांना पुरेसे खाणे उपलब्ध होणे, हे सध्याच्या काळातील सर्वात जटील आव्हान आहे. तसे पाहिले तर सध्या अन्नधान्याचा तुटवडा आहे असे नाही. पण ही स्थिती कायम राहणार नाही, असा इशारा संशोधकांनी दिला आहे. वाढती लोकसंख्या आणि औद्योगिकरण यामुळे शेतभूमी झपाट्याने कमी होत आहे. परिणामी, कमीत कमी भूमीत जास्तीत जास्त धान्य किंवा भाजीपाला कसा पिकविता येईल, हे पाहिले जात आहे. याच पार्श्वभूमीवर सध्या ब्रिटनमधील एका शेतकरी दांपत्याची चर्चा होत आहे. या दांपत्याने हत्तीच्या पिलाच्या वजनाएवढा भोपळा उगविला आहे.
या भोपळ्याचे वजन तब्बल 390 किलोग्रॅम आहे. हत्तीच्या नुकत्याच जन्मलेल्या पिलाचे वजन 100 ते 120 किलोग्रॅम असते. हे लक्षात घेता या हा भोपळा हत्तीच्या तीन पिलांएवढा वजनदार असल्याचे दिसून येते. हा भोपळा ‘अटलांटिक जायंट’ या जातीचा आहे. भोपळ्याची ही जात तिच्या वजनासाठी प्रसिद्ध आहे. तथापि, जस्टिन ग्रिफिथ आणि के. वॉकर या दांपत्याने आपल्या बागेत उगविलेला हा भोपळा जगभरात चर्चेचा विषय बनला आहे. तथापि, हा विक्रम नाही.
गेल्या वर्षी ब्रिटनमध्येच इयान पॅटन आणि स्टुअर्ट पॅटन या जुळ्या बंधूंनी त्यांच्यात शेतात 1 हजार किलोपेक्षा अधिक वजनाचा भोपळा उगवून विक्रम केला आहे. या बंधूंनी तीन महिने प्रत्येक दिवशी तीन तास असे कष्ट या भोपळ्याचे संवर्धन करण्यासाठी घेतले होते. या भोपळ्याच्या देखभालीसाठी त्यांनी व्रेनचा उपयोग करावा लागला होता. एवढे करुनही तो विश्वविक्रम नव्हता. मात्र, ब्रिटनमधील विक्रम त्यांनी आपल्या नावांवर केला होता, अशी माहिती दिली जाते.









