खानापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील नागरिकांच्या बैठकीत निर्णय
खानापूर : तालुक्याचा पश्चिम भाग तसेच भीमगड अभयारण्यातील आणि दुर्गम भागातील जंगल परिसरात वसलेल्या खेड्यांच्या जनतेला वनखात्याच्या आडमुठ्या धोरणामुळे जीवन जगणे कठीण बनले आहे. वनखात्याच्या जाचक अटी व त्रासामुळे या भागातील जनतेला जगावे की मरावे, अशा परिस्थितीत दिवस काढावे लागत आहेत. याबाबत सरकारही दुर्लक्ष करत आहेत. यासाठी या भागातील जीवन सुलभ व सहज होण्यासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा निर्णय शनिवारी झालेल्या पश्चिम भागातील नागरिकांच्या बैठकीत घेतला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी ग्रा. पं. संघटनेचे अध्यक्ष विनायक मुतगेकर होते. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे वकील सोनाप्पा नांद्रनकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ग्रा. पं. सदस्य विजय मादार यांनी बैठकीचा उद्देश स्पष्ट करताना म्हणाले, तालुक्याच्या पश्चिम भागातील जंगल भागातील नागरिकांना गेल्या पाचवर्षापासून वनखात्याच्या जाचामुळे जीवन जगणे कठीण बनले आहे. शेती व इतर व्यवसायही अडचणीत आले असून गावांचा विकास काही वर्षापासून ठप्प झाला आहे. ना रस्ते, ना लाईट, ना पाणी योजना तसेच शेती करण्यासाठी वन्य प्राण्यांच्या त्रासामुळे शेतीही धोक्यात आली आहे. असे असताना वनखाते कोणत्याही प्रकारच्या सहकार्याची भूमिका घेत नाहीत, त्यामुळे नागरिकांचा जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. यासाठी अनेकवेळा अर्ज विनंत्या, मोर्चे, रास्तारोको अशी आंदोलने केली. मात्र सरकार याकडे गांभीर्याने पहात नसल्याने या भागातील गावांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तालुका पंचायतीचे माजी सदस्य अशोक देसाई यांनी येणाऱ्या समस्या व त्याबाबतीत आपले विचार मांडले. मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष नारायण कापोलकर, करंबळ ग्राम पंचायत सदस्य उदय भोसले, माचीगड ग्राम पं. चेअरमन कोलकार मॅडम, हलगा ग्राम. पं.सदस्या सावित्री मादार यांनी आपले विचार मांडले.
खानापूर तालुक्यावर अन्याय का ?
हल्याळ तालुक्मयातील जंगलमय प्रदेशातील नागरिकावर वनखात्याच्या कठीण व जाचक अटी शिथिल केल्या आहेत. खानापूर तालुक्मयातील जंगलात वास्तव्य करून राहणाऱ्या नागरिकांवर अनेक जाचक अटी घालून सरकारने या लोकांचे जगणे मुश्कील केले आहे. जंगलातून जाणारे रस्ते खरोखरच वनखात्याच्या अडवणुकीमुळे केले जात नाहीत तसेच वीज, शाळा, व इतर विकासकामे ठप्प झाली आहेत. शेतीसाठीचे रस्ते वनखात्याने चरी मारुन बंद केले आहेत. पश्चिम भागातील भीमगड अभयारण्य क्षेत्रातील गावातील नागरिकांना तर जगणे नकोसे झाले आहे. त्यामुळे याबाबत खरोखरच वनखात्याच्या इतक्या जाचक अटी आहेत का, यासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करुन दाद मागण्याचे यावेळी ठरविण्यात आले. ठरविण्यात आले. यावेळी कबनाळी गावचे नागरिक लक्ष्मण राणे, सीताराम राणे, राजू धुरी, पांडुरंग देसाई, आनंद गावकर, सहदेव दळवी, ईश्वर बोबाटे मणतुर्गा, यशवंत देसाई तिवोलीवाडा, जयवंत गांवकर कोंगळा तसेच ओतोळी, कांजळा, व अनेक गावातील नागरिक उपस्थित होते.









