पुणे / प्रतिनिधी :
कसबा पोटनिवडणूक होऊन सात महिने झाले आहेत. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या आशीर्वादाने कसबा मतदारसंघातील मूलभूत सोयी-सुविधा व विकासकामांसाठी उपलब्ध झालेला दहा कोटी रुपयांचा आर्थिक निधी पर्वती मतदारसंघातील भाजप आमदारांकडे वळविण्यात आला आहे, असा आरोप करत काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी चंद्रकांत पाटलांविरोधात आंदोलन छेडणार असल्याचा इशारा दिला.
याबाबत बोलताना धंगेकर म्हणाले, संबधित निधी देण्याबाबत काही तांत्रिक अडचण होती. ती सोडवून निधी मिळणे अपेक्षित होते. परंतु सदर निधी परस्पर वळविण्यात आला आहे. आगामी काळात ज्या ठिकाणी पालकमंत्री यांचा कार्यक्रम असेल, तिथे जाऊन मी धरणे निदर्शने करणार आहे तसेच त्यांच्या घराबाहेरदेखील आंदोलन करणार आहे.
निवडणुकीत पैशाचा वापर
निवडणुकीमध्ये भाजपने पैशाचा वापर भरपूर केला. पण नागरिकांनी त्याला भीक घातली नाही. त्याचा राग मनात धरून चुकीच्या पद्धतीने पैसे दुसऱ्या मतदारसंघात वळविण्यात आले आहेत. शहराच्या मध्यवस्तीत पेठेत अनेक प्रकारच्या अडचणी असून, त्या सोडवल्या गेल्या पाहिजेत. वेळ पडली तर न्यायालयाच्या माध्यमातून आम्ही यापुढे लढा देणार आहे. दिवंगत भाजप आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर त्यांची अपूर्ण कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, असेही त्यांनी सांगितले.
पालकमंत्र्यांकडून जनतेचा अपमान
गिरीश बापट यांनी अनेक वर्ष या भागात लोकप्रतिनिधी म्हणून काम केले. तीच कामाची पद्धत आम्ही पुढे सुरू ठेवली. मात्र, पालकमंत्री जनतेचा अपमान करत आहेत. विकासाच्या कामासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कधी कुरघोडीचे राजकारण केले नाही. परंतु चंद्रकांत पाटील यांनी घाणेरडे राजकारण करत हक्काचा विकास निधी वळवला आहे. मुख्यमंत्री, पालकमंत्री व नगरविकास विभागाने मतदारसंघाचा हा हक्काचा निधी पुन्हा कसब्याला द्यावा. अन्यथा, कसब्यातील जनता सत्ताधाऱ्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. विरोधी पक्षातील आमदार असल्याने सत्ताधारी पक्षाकडून हा कुरघोडी करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. यासंदर्भात राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सचिव आणि आयुक्त या सर्वांनाच पत्रव्यवहार केला असल्याचेही धंगेकर यांनी नमूद केले.








