आतापर्यंतची ही सर्वांत मोठी भारतीय राष्ट्रीय स्पर्धा ठरणार असून तसा विक्रम नोंद होणार आहे. या स्पर्धेने गोव्याला क्रीडाक्षेत्रात बरेच काही मिळवून दिले असून राष्ट्रीय स्तरावर पुन्हा गोवा प्रकाशझोतात आला आहे. या स्पर्धांमुळे गोव्याच्या क्रीडाक्षेत्राला आश्वासक वळण प्राप्त झाले आहे.
प्राचीन काळापासून अनेक प्रकारच्या मैदानी क्रीडा प्रकारांनी समृद्ध असलेल्या भारतात मध्य युगात आक्रमकांनी भारतीय क्रीडा संस्कृतीही नष्ट करुन टाकण्याचा पाशवी प्रयत्न केला आणि त्यांचे खेळ भारतीयांवर लादले. काहीप्रमाणात भारतीय, मुले व युवाशक्ती त्यांच्या कपटाला बळीही पडली आणि त्यांनी आक्रमकांचेही खेळ आत्मसात केले. त्यामुळे भारताचे नुकसान झाले. मानवी शरीराला, मनाला पोषक असणारे, बुद्धीला तल्लख बनविणारे अनेक भारतीय खेळ काळाच्या पडद्याआड गेले. आज विकासाच्या प्रगतीपथावर असलेला भारत स्वत:च्या तसेच जागतिक खेळ प्रकारांमध्येही स्वत:ची नाममुद्रा उमटवत आहे. सध्या गोव्यात सुरु असलेली 37 वी राष्ट्रीय स्पर्धा ही केवळ देशासाठीच नव्हे, तर अवघ्या जगासाठी वैशिष्ट्यापूर्ण क्रीडा घटना ठरली आहे. 19 ऑक्टोबरपासून सुरु झालेल्या या स्पर्धांचा उद्घाटन सोहळा 26 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाला असून 9 नोव्हेंबरपर्यंत विविध 43 खेळांच्या स्पर्धा चालणार आहेत. गोव्याचा ‘मोगा’ हा या स्पर्धेचा शुभंकर आहे. गेले दशकभर या स्पर्धांच्या आयोजनाची संधी मिळण्याची वाट पाहत असलेल्या गोव्याला यंदा संधी मिळाली आणि गोव्याने आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आयोजनासह अनेक नव्या गोष्टी सुरु केल्या, नवे विक्रमही केले. आतापर्यंतची ही सर्वांत मोठी भारतीय राष्ट्रीय स्पर्धा ठरणार असून तसा विक्रम नोंद होणार आहे. गोव्याने या स्पर्धांतील विजेत्यांना सुवर्ण, रौप्य, कास्य या पदकांसह अनुक्रमे रोख तीन लाख, दोन लाख, एक लाख रुपये अशी बक्षिसे आणि त्या विजेत्यांच्या प्रशिक्षकांनाही रोख बक्षिसे देण्याची महत्वपूर्ण घोषणा करुन नवा पायंडा पाडला आहे.
या राष्ट्रीय क्रीडाकुंभात 28 राज्ये व 8 केंद्रशासित प्रदेशांतील मिळून तब्बल 10 हजारांहून अधिक खेडाळू सहभागी झाले आहेत. काल बुधवारपर्यंतच्या पदक तालिकेत 54 सुवर्णपदकांसह 38 रौप्य, 39 कास्य मिळून तब्बल 131 पदकांना गवसणी घालून महाराष्ट्राने पहिले स्थान प्राप्त केले आहे. यजमान गोवाही गेल्या काही वर्षांपेक्षा चांगली कामगिरी करत असून 2 सुवर्णपदके, 5 रौप्य, 23 कास्य मिळून 30 पदकांसह 19 व्या स्थानावर आहे. गोव्याची ही कामगिरी पदक तालिकेत विशेष लक्ष वेधून घेणारी नाही. यापूर्वी गोवा राष्ट्रीय स्पर्धांत विशेष चमक दाखवू शकत नव्हता, त्यापेक्षा ही कामगिरी नक्कीच आशादायी आहे.
देशातील बदलत्या क्रीडाक्षेत्राप्रमाणे गोव्यातही क्रीडा क्षेत्र झपाट्याने विकसित होत आहे. आपल्या देशात ‘खेळायला गेला म्हणजे वाह्यात गेला’ अशी जी धारणा होती, तिच्यापासून गोवाही वेगळा नव्हता. शाळेतील शारीरिक शिक्षणाचा तास, गावातील मंदिर परिसरात किंवा उघड्या शेतात वाड्यावरील मुलांनी सायंकाळच्या वेळेस खेळावे, बागडावे एवढाच काय तो खेळ होता. मात्र आता गोव्यातही खेळालाही फार महत्त्व आले आहे. जे खेळाडू तालुका, जिल्हा, राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळतात त्यांना शैक्षणिक गुण मिळतात जे परीक्षेच्या गुणतक्त्यात समाविष्ट होतात. खेळाडूंना प्रायोजकत्वही मिळते. नोकरीत प्राधान्य मिळते. या सर्व सुविधांसह तनाची व मनाची तंदुरुस्ती मिळते हे विशेष! आजच्या धावपळीच्या, इंद्रियांवर भरपूर ताण देणाऱ्या जीवनशैलीत खेळ सर्वांर्थाने महत्वपूर्ण ठरले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेली ‘खेलो भारत’ योजनाही खूपच प्रभावी ठरली असून तिचे उज्ज्वल परिणामस्वरुप देशाला आशियाई स्पर्धांमध्ये दिसले आहेत. मोदींची प्रशंसा करणाऱ्यांना जे अंधभक्त म्हणतात त्या ‘अंधभक्तांना’ ही चमक कदाचित नाही दिसणार, पण क्रीडा जगतातही भारत आगेकुच करत आहे हे वास्तव! खेळाडूंना पोषक असे वातावरण, स्पोर्ट्स कीट, योग्य प्रशिक्षण, आर्थिक मदत, प्रोत्साहन, योग्य निवड प्रक्रिया झाल्यास खेळाडू मैदाने गाजवितात आणि देशाचे नाव उज्ज्वल करतात. जो रोज खेळाचा सराव करतो, अवांतर व्यायाम करतो तो सदा सुदृढ राहतोच. एवढेच नव्हे तर तो उत्कृष्ठ खेळाडू त्याचबरोबर तंदुरुस्त, निरोगी नागरिकही बनतो. क्रिकेटसारख्या महागड्या खेळाने व्यावसायिकांचा धंदा होतोच, पण त्यातून किती लोक स्वस्थ होतात, हा प्रश्न असतोच. गोव्यात ‘लुसोफोनिया’ क्रीडा स्पर्धेमुळे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बऱ्याच क्रीडा साधनसुविधा निर्माण करण्यात आल्या होत्या. या राष्ट्रीय स्पर्धांमुळे आता अनेक क्रीडास्थाने निर्माण झाली, त्यांचा फायदा गोव्याला आगामी काळातही होणार आहे. या सर्व साधनसुविधा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आहेत. स्पर्धेतील बहुतेक राष्ट्रीय अधिकारी, तज्ञ याबाबत समाधान व्यक्त करत आहेत. गेला महिनाभर गोव्यात ठाण मांडून या स्पर्धेवर नजर ठेवणाऱ्या, भारतीय ऑलिपिंक महासंघाच्या चेअरमन तसेच भारतीय ज्येष्ठ धावपटू पी. टी. उषा यांनीही याबाबत गोव्याचे कौतुक केले आहे. साधनसुविधा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आहेतच, पण गोव्यातील आयोजनही उच्च दर्जाचे आहे. जळीस्थळी नीटनेटकेपणा, अत्त्याधुनिकता, स्वच्छता, परिपूर्णता ही गोव्यातील आयोजनाची वैशिष्ट्यो ठरली आहेत. या स्पर्धेने गोव्याला क्रीडाक्षेत्रात बरेच काही मिळवून दिले आहे.
राजू भिकारो नाईक








