सांगली :
संजयनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या जुना कुपवाड रोडवरील समर्थ कॉलनी येथे बंद घर फोडून चोरट्यांने घरातील कपाटात ठेवलेले सोन्याचे 60 हजाराचे दागिने लंपास केले आहेत. याबाबत सौ. रूपाली सिध्दू कांबळे रा. जुना कुपवाड रोड, समर्थ कॉलनी, लक्ष्मी मंदिरजवळ सांगली यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात नोंद केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी सौ. कांबळे या शहरातील एका महाविद्यालयात प्राध्यापिका आहेत. काही कामानिमित्त त्या 22 ते 25 मे या कालावधीत बाहेर गावी गेल्या होत्या. त्यांचे घर बंद होते. चोरट्याने त्यांच्या घराच्या गच्चीवरील दरवाजाला असणारा कडी-कोयंडा उचकटून घरात प्रवेश केला आणि घरातील कपाटात ठेवलेले 60 हजार रूपयांचे सोन्याचे मंगळसूत्र लंपास केले आहे. त्या घरी आल्यानंतर त्यांना हा प्रकार लक्षात आला. त्यांनी संजयनगर पोलीसांशी संपर्क साधला. पोलिसांनी पाहणी केली आणि अज्ञात चोरट्याविरूध्द संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे.








