बंडी-फेटे न मिळण्यासह विविध प्रकारांबद्दल सत्ताधारी गटातील नगरसेवकांनी उघडपणे व्यक्त केली नाराजी
मडगाव : मडगावातील शिमगोत्सव शोभायात्रा शनिवारी लोकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडल्याने आयोजकही सुखावले असले, तरी काहींना बंडी आणि फेटे न मिळाल्याने सुरू झालेला नाराजीचा शिमगा मात्र संपलेला नाही. त्यातच पालिकेच्या सत्ताधारी गटातील काही नगरसेवकांनी उघडपणे प्रसारमाध्यमांसमोर येऊन नाराजीचा सूर आळवला आहे. चार वेळा निवडून आलेले ज्येष्ठ नगरसेवक राजू उर्फ पाकलो नाईक यांनी कार्यकर्त्यांना वाटण्यासाठी बंडी आणि फेटे न मिळाल्याने उघडपणे नाराजी व्यक्त केली. शोभायात्रेत भाग न घेता आपण बहिष्कार घातल्याचे त्यांनी या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. आपण मागील कित्येक वर्षे नगरसेवक आहे. विरोधी गटात असतानाही बंडी आणि फेटे देण्याच्या बाबतीत आपल्यावर अन्याय झाला नाही. कार्यकर्त्यांनी आपल्या घरी येऊन बंडी आणि फेटे देण्यासाठी तगादा लावला. परंतु कित्येकांशी संपर्क साधूनही आपणास कोणी प्रतिसाद दिला नाही, असा दावा नाईक यांनी केला. आपला शिमगोत्सव समितीचे अध्यक्ष असलेले आमदार दिगंबर कामत अथवा नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांच्यावर रोष नाही. कारण या बंडी आणि फेटे वाटण्याची जबाबदारी घेतलेल्या राजकारण्याने आमच्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले, असा आरोप नगरसेवक नाईक यांनी केला. विरोधी गटातील नगरसेवकांसह सत्ताधारी गटातील अन्य काही नगरसेवकांनाही अशा प्रकारे डावलण्यात आले. मात्र नेत्यांच्या विरोधात उघडपणे बोलण्यास ते धजत नसल्याचा दावा नाईक यांनी केला.
मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार : आमोणकर
दुसरीकडे, प्रभाग 15 चे नगरसेवक महेश आमोणकर यांनी व्यासपीठावर नगरसेवकांच्या कुटुंबियांना बसण्यास मिळणार नसल्याचे सांगून काहींनी नंतर स्वत:च हा नियम मोडल्याचा दावा केला आहे. काही वेळ आपणासही व्यासपीठावर बसण्यास आसन मिळाले नाही, असे त्यांनी सांगितले. पालिकेतील नगरसेवकांना मिळणारी वागणूक तसेच अन्य कारभारावर आपण खूष नसून यासंदर्भात आपण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे आमोणकर यांनी स्पष्ट केले. आम्ही संस्थापक सदस्य असताना आम्हाला दरवर्षी मानाने मिळणारा फेटाही पाठवून देण्यास आयोजक विसरले. अध्यक्ष निवडीसाठीच्या बैठकीला बोलावून अध्यक्ष निवड झाल्यानंतर मात्र सारे जण आम्हाला विसरले. आमदार दिगंबर कामत हे ब्रिटनला गेल्यानंतर शिमगोत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घोळ घातला. ही बाब मी कामत यांच्या कानावर घालून माझी नाराजी त्यांना कळविली आहे, अशी प्रतिक्रिया मडगावातील एका माजी नगराध्यक्षाने व्यक्त केली.
पहाटेपर्यंत मिरवणूक चालण्याची परंपरा कायम
दरम्यान, पहाटेपर्यंत शिमगोत्सव मिरवणूक चालण्याची परंपरा यंदाही मडगावात दिसली. मागील दहा वर्षांत हा प्रकार सतत पाहायला मिळाला आहे. पूर्वी रात्री बारा-साडेबारापर्यंत ही मिरवणूक आटोपायची. किमान ती मुदत तरी पाळली जायला हवी, अशी प्रतिक्रिया अनेक मडगाववासियांनी व्यक्त केली. पहाटेपर्यंत मिरवणूक चालल्यानंतर आयोजनस्थळी आयोजक व स्पर्धक सोडल्यास अन्य कुणी नसतात. याचा शेवटी उपयोग तो काय, असा प्रश्न त्यांनी केला. पूर्वी लोककला पथके, रोमटामेळ आणि नंतर चित्ररथ असा क्रम मिरवणुकीत दिसायचा. मात्र आता मध्येच रोमटामेळ, मध्येच चित्ररथ असा प्रकार पाहायला मिळतो. यंदाही मडगाव शिमगोत्सवात हीच बाब पाहाला मिळाली, अशी प्रतिक्रिया काहींनी व्यक्त केली.









