शनिवार-रविवारी स्पर्धेचेही आयोजन : परिसरात उत्साहाचे वातावरण
बेळगाव : अनगोळ येथे हनुमान जयंतीनिमित्त येत्या शनिवार-रविवारी गाडेयात्रा आयोजित केली आहे. यंदाही अनगोळ येथे दि. 12 रोजी चैत्र पौर्णिमेला हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या निमित्त अनगोळ मारुती गल्ली मारुती मंदिर, रघुनाथ पेठ हनुमान मंदिर, गाडगीळ बस स्टॉप येथील हनुमान मंदिर व भांदूर गल्ली तालीम नाथ पै नगर विठ्ठल रुक्मिणी मारुती मंदिर या ठिकाणी शनिवारी सूर्योदयाला हनुमान जन्मोत्सव साजरा होणार आहे.
दरवर्षी अनगोळ येथे आकर्षक विद्युत रोषणाई केलेले गाडे, बैलजोड्या सजवून हलगीच्या निनादात गुलालाची उधळण करीत मिरवणूक काढण्यात येते. यावेळी रघुनाथ पेठ, राजहंस गल्ली, भांदूर गल्ली, लोहार गल्ली, झेरे गल्ली, हणमण्णावर गल्लीतील शेतकरी बांधव तसेच युवक मंडळे यांच्यावतीने सायंकाळी मिरवणुकीने ग्रामदैवत मारुती गल्ली येथील मारुती मंदिर येथे प्रदक्षिणेसाठी निघतात. रात्री गांधी स्मारक लक्ष्मी मंदिर येथे गाड्यांसमोर वादकांची जुगलबंदी रंगणार आहे. रविवारी सकाळी 11 नंतर शेतकरी बांधवांच्यावतीने सजविलेल्या बैलजोड्यांची मिरवणूक काढण्यात येणार आहे. गावातील प्रत्येक भागातून सायंकाळी ही मिरवणूक निघणार आहे.
यात्रेनिमित्त बैलजोडी-गाडा सजावट स्पर्धा
श्री हनुमान जयंती जन्मोत्सवनिमित गेल्या काही वर्षांपासून श्रीराम सेना हिंदुस्थान व श्रीराम युवक मंडळ, राजहंस गल्ली, अनगोळ यांच्यावतीने बैलजोडी सजावट, गाडा सजावट आणि उत्कृष्ट हलगी मेळा स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकरी बांधव तसेच बैलजोडी मालक व हनुमान जयंती उत्सव मंडळ यांच्यात उत्साहाचे वातावरण निर्माण होत आहे. यंदाही भव्य स्पर्धा आयोजिण्यात आली आहे. त्यामुळे बैलजोडी मालक व शेतकरी बांधवांच्यात उत्साह संचारल्याचे अनुभवास येत आहे. त्यामुळे अनगोळ हनुमान गाडा यात्रेनिमित्त गावात बैलजोड्यांची खरेदी झाली आहे. त्यामुळे यावेळी हलगी मेळ्याची जुगलबंदी आणि गाड्यांची सजावट पाहावयास मिळणार आहे. या स्पर्धेसाठी रोख पारितोषिक व स्मृतिचिन्ह देण्यात येणार आहे.
हनुमान जयंतीनिमित्त रथ ओढणे परंपरा
हनुमान जयंती जन्मोत्सवनिमित्त कित्येक दशकांपासून अनगोळला मारुती मंदिरचा रथ ओढण्याची परंपरा आहे. गावच्या व मंदिराच्या स्थापनेपासून यात्रेच्या निमित्ताने मारुती मंदिर येथे रथ निर्माण करण्यात आला. रथावर मारुतीची मूर्ती आरूढ असून हनुमान जयंतीला संपूर्ण गावात हा रथ ओढला जातो. प्रत्येक गल्लीतील नागरिक रथाची पूजा करतात. गावात रथ फिरवून सायंकाळी मंदिरासमोर आल्यानंतर यात्रेला सुरुवात होते. सर्वांनी यात्रेचा व हनुमान जन्मोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन अनगोळ यात्रा कमिटी व देवस्थान कमिटीने केले आहे.
घुमटमाळ मारुती मंदिरात हनुमान जयंती कार्यक्रम
सालाबादप्रमाणे घुमटमाळ माऊती मंदिर, हिंदवाडी येथे हनुमान जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम आयोजिण्यात आले आहेत. शुक्रवार दि. 11 रोजी सायंकाळी 8 वा. आरती, 9.30 पर्यंत वारकरी सांप्रदायिक भजनी मंडळाचा भजन कार्यक्रम होईल. शनिवार दि. 12 रोजी पहाटे 4 वा. अभिषेक, पहाटे 5 नंतर हभप कृष्णमूर्ती बोंगाळे यांचे कीर्तन, सूर्योदयाला हनुमान जन्मोत्सव, तीर्थप्रसाद, त्यानंतर दुपारी 12 ते 3 पर्यंत सर्वांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले आहे. भक्तांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन घुमटमाळ माऊती मंदिर ट्रस्ट कमिटी अध्यक्ष चंद्रकांत बांडगी, सेव्रेटरी प्रकाश माहेश्वरी व ट्रस्टीज यांनी केले आहे.









