गावोगावी लसीकरण : फैलाव रोखण्यासाठी पशुसंगोपन खात्याचे प्रयत्न
बेळगाव : जिल्ह्यात लम्पीचा शिरकाव झाल्याने खबरदारी म्हणून पशुसंगोपन खात्याने लम्पी प्रतिबंधक लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. गावोगावी जाऊन जनावरांना प्रतिबंधक लस टोचली जात आहे. दरम्यान, पशुपालकांनी आपल्या जनावरांना लस टोचून घ्यावी, असे आवाहन खात्याने केले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात लम्पीचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात वाढला आहे. दरम्यान, शेजारी असलेल्या निपाणी तालुक्यातदेखील लम्पीचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे पशुसंगोपन खाते आणि पशुपालकदेखील धास्तावले आहेत. दरम्यान, पशुसंगोपन खात्याने लम्पी प्रतिबंधक लसीकरण मोहीम तातडीने हाती घेतली आहे. जनावरांना रोगापासून दूर ठेवण्यासाठी लसीकरण मोहीम अधिक तीव्रपणे राबविली जात आहे.
शेतकऱ्यांना मदत
गतवर्षी ऑगस्ट दरम्यान तालुक्यात लम्पीचा शिरकाव झाला होता. त्यानंतर सर्वत्र रोगाचा झपाट्याने फैलाव झाला होता. जिल्ह्यात 25 हजारहून अधिक जनावरांचा बळी गेला होता. त्यामुळे पशुपालकांना मोठा फटका बसला होता. विशेषत: गोवर्गीय जनावरांना या रोगाची अधिक लागण होते. त्यामुळे पशुपालकांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे. गतवर्षी दगावलेल्या जनावरांसाठी शासनाने मदत जाहीर केली होती. बैलाला 30 हजार व गायीला 20 हजार आणि वासराला 5 हजार रुपये मदत देऊ केली होती. पहिल्या टप्प्यात काही नुकसानग्रस्त पशुपालकांना मदत मिळाली आहे. मात्र, अद्यापही शेवटच्या टप्प्यातील नुकसानग्रस्त शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.
दूध उत्पादनातही मोठी घट
लम्पी रोगामुळे दुभत्या जनावरांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे एकूण दूध उत्पादनातदेखील मोठी घट झाली होती. तर काही पशुपालकांचा या रोगाने संपूर्ण गोठाच रिकामा झाला होता. त्यामुळे नुकसानग्रस्त पशुपालक अडचणीत आले होते. अशा परिस्थितीत जनावरांचा या रोगापासून बचाव करण्यासाठी पशुपालकांनी योग्य ती खबरदारी घेऊन जनावरांना लस टोचून घेण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन खात्याने केले आहे.









