स्वस्तिक युनियन क्रिकेट क्लबच्या पहिल्या दिवशी 338 धावा :
क्रीडा प्रतिनिधी/ बेळगाव
कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना मान्यताप्राप्त बेंगळूर विभागीय सर मिर्झा इस्माईल सय्यद ए डिव्हिजन चषक क्रिकेट स्पर्धेत शनिवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात स्वस्तिक युनियन क्रिकेट क्लबने मोहंत जॉय क्रिकेट क्लबवरती पहिल्या दिवशी 338 धावा जमविल्या. बेळगावच्या सुजय सातेरीने दमदार शतक झळकवित संघाला सावरले.
बेंगळूर येथील केएससीए क्रिकेट मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या ए डिव्हिजन क्रिकेट स्पर्धेत स्वस्तिक युनियन क्रिकेट क्लबने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या दिवशी 90 षटकात 6 गडी बाद 338 धावा जमविल्या. 3 बाद 72 धावा अशी नाजूक स्थिती असताना यष्टीरक्षक सुजय सातेरीने दमदार खेळीच्या जोरावर नागाभरतच्या साथिने स्वस्तिक युनियन संघाला सुस्थितीत नेऊन पोहोचविले. त्यामध्ये सुजय सातेरीने 2 षटकार, 12 चौकारांसह 184 चेंडूंना तोंड देत दमदार शतक झळकवित 126 धावांचे योगदान दिले. त्याला नागाभरतने 11 चौकारांच्या मदतीने 68, आशिष महेशने नाबाद 6 चौकारांसह 48, यशवंतने 6 चौकारांसह 41, कार्तिक सिंहने 3 चौकारांसह 21 धावा केल्या. मोहंत जॉय क्रिकेट क्लबतर्फे लिखित बन्नूरने 3, श्रवण गौडा, मोहितकुमार ए. व सुचित यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. पहिल्या दिवशी खेळ संपल्यावर स्वस्तिक युनियनने 90 षटकात 6 गडी बाद 338 धावा केल्या. सुजय सातेरी नाबाद 126 व आशिष महेश नाबाद 48 धावांवर खेळत आहेत.









