डॉ. प्रभाकर देसाई यांचे प्रतिपादन : राणी चन्नम्मा विद्यापीठ-माजी विद्यार्थी संघटनेतर्फे राष्ट्रीय चर्चासत्र
प्रतिनिधी /बेळगाव
आयुष्याच्या पूर्वार्धात कुंचल्यातून रंग भरणाऱया डॉ. विनोद गायकवाड यांनी शब्दांच्या फटकाऱयाने साहित्य निर्मिती करत मराठीबरोबर कन्नड साहित्याच्या प्रांगणात लोकप्रिय लेखक म्हणून वाचकांच्या हृदयावर राज्य केले. लोकप्रिय लेखक नेहमीच नव्या वाचकांची निर्मिती करीत असतो. हे कोणत्याही साहित्यासाठी अनमोल असते आणि ते अवघड काम गायकवाड यांनी आपल्या लेखनीतून साध्य केले, असे विचार पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख डॉ. प्रभाकर देसाई यांनी व्यक्त केले.
राणी चन्नम्मा विद्यापीठ बेळगाव आणि माजी विद्यार्थी संघटना आयोजित डॉ. विनोद गायकवाड व्यक्ती आणि वाङ्मय या विषयावरील एकदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्रात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राणी चन्नम्मा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. एम. रामचंद्र गौडा होते.
डॉ. रामचंद्र गौडा यांनी डॉ. विनोद गायकवाड यांच्या साहित्याचे कौतुक करत पुढील काळात त्यांनी नवीन साहित्यिकांना मार्गदर्शन करावे, असे आवाहन केले. गिरीष जोशी यांनी स्वागतगीत तर मराठी विभाग प्रमुख डॉ. चंद्रकांत वाघमारे यांनी प्रास्ताविक केले. व्यासपीठावर कुलसचिव प्रा. एम. हनुमंतप्पा, डॉ. शिवानंद उपस्थित होते. डॉ. यशवंत पाटणे यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन डॉ. मनीषा नेसरकर यांनी केले. डॉ. मैजोद्दीन मुत्तवल्ली यांनी आभार मानले.









