राजापूर :
शहरापासून जवळच असलेल्या कोंढे तर्फ राजापूर (कोंढेतड) येथील गावठाण सड्यावर एक वापी (बारव) व एक तडाग (चौकोणी टाके) आढळून आले आहे. विनोद पवार व जगनाथ गुरव यांना हे ठिकाण आढळले असून ही वापी व तडाग मध्ययुगीन असल्याचा अंदाज इतिहास संशोधकांनी वर्तवला आहे.
शहरालगतच्या कोंढेतड ग्रामपंचायतीच्या हद्दीत गावठाण सड्यावर असणाऱ्या या तडाग व वापीला येथील स्थानिक लोक पांडवकालीन तळे व विहीर असे म्हणत असले तरी ही कला साधारण मध्ययुगातील आहे. मध्ययुगात जलस्त्रोतांवर मोठ्या प्रमाणात भर देण्यात आला. त्याच दरम्यान वेगवेगळ्या प्रकारचे नैसर्गिक जलस्त्रोत जतन करण्यात आले. त्याची बांधणी करण्यात आली. मध्ययुगीन काळात पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत मोठ्याप्रमाणावर निर्माण केले गेले व जतन केले गेले.
भारतात मध्ययुगाचा काळ हा गुप्त साम्राज्याच्या पतनानंतर (इसवी सन ५००) सुरू होऊन मुघल साम्राज्याच्या उदयापर्यंत (सुमारे इसवी सन १५२६) असा मानला जातो. बारव, पुष्करणी, कुंड, तडाग, वापी, विहीर, पोखरणी, बावी असे जलस्त्रोताचे विविध प्रकार आहेत. त्या प्रकारातील एक वापी व एक तडाग या सड्यावर आहे.
- तडागची माहिती
तडाग म्हणजे लहान आकाराचे तळे किंवा टाके. पोखरणीपेक्षा मोठ्या जलाशयाला तडाग तळे किंवा तलाव म्हणतात. तडागमध्ये उतरण्यासाठी पूर्व पश्चिम पायऱ्या असून या मध्ये वर्षभर पाणी असल्याची माहिती येथील ग्रामस्थ देतात. या तडागाच्या मध्यभागी एक मोठ्या दगडांची (चिऱ्याची) भिंत बांधलेली असून संपूर्ण तडाग हा चिऱ्याच्या दगडात बांधलेला आहे. सध्यस्थितीत या तडागचा वरचा भाग बहुदा ग्रामस्थ किंवा ग्राम पंचायतीने बांधलेला दिसून येतो. तडाग अर्थात सरोवर सहा प्रकारचे असतात. सर, महासर, भद्रक, सुभद्रख्य, परीघ आणि युग्मपरीघ अशी त्यांची नावे आहेत.
- वापीची माहिती
इंग्रजी टी आकाराची असणारी ही वापी साधारण दोन फूट रुंद व १५ फूट लांब आहे. वापीची उंची ही १० ते १५ फूट आहे. ही वापीही नंदा प्रकारातील असून तिला पश्चिमेकडुन पूर्वेकडे जाणाऱ्या पायऱ्या आहेत, त्या या वापीच्या अगदी तळापर्यंत जातात. वापी म्हणजे पायऱ्या असलेली आयताकृती, लंबगोल किंवा गोल विहीर, वापी या चार प्रकारच्या असतात. नंदा, भद्रा, जया आणि विजया अशी त्यांची नावे आहेत. नंदा वापी एकमुखी, भद्रा वापी दोन मुखी, जया वापी तीनमुखी तर विजया नावाची वापी चार मुखांची अर्थात चार प्रवेशद्वाराची असते. गावठाण सड्यावर आढळून आलेली वापी ही नंदा प्रकारातली वापी आहे.
या शोधकार्यात जगन्नाथ गुरव, ओंकार गुरव यांचे मोलाचे सहकार्य लाभले. याबाबतची सखोल माहिती इतिहास संशोधक अनिल दुधाने, लक्ष्मण सोनवटकर यानी दिली.








