गेहलोतांच्या नेत्या सोनिया नव्हे तर वसुंधरा राजे
वृत्तसंस्था / जयपूर
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि त्यांच्याच पक्षाचे नेते सचिन पायलट यांच्यातील संघर्ष पुन्हा पेटला आहे. पायलट यांनी गेहलोतांच्या आरोपांवर मंगळवारी जाहीरपणे प्रत्युत्तर दिले आहे. एखादा मुख्यमंत्री स्वत:च्याच पक्षाचे आमदार अन् खासदारांच्या विरोधात टीका करत असल्याचे पहिल्यांदाच पाहत आहे. गेहलोतांकडून भाजप नेत्यांचे कौतुक अन् काँग्रेस नेत्यांचा अपमान माझ्या आकलनाच्या पलिकडील असल्याचे पायलट यांनी म्हटले आहे.

गेहलोत यांची विधाने पाहता सोनिया गांधी नव्हे तर वसुंधरा राजे त्यांच्या नेत्या असल्याचे वाटते. स्वत:च्या नेत्यांना खूश करण्यासाठी अनेक जण बऱ्याच गोष्टी करत असतात. परंतु हा प्रकार गेहलोतांना शोभत नसल्याची टिप्पणी पायलट यांनी केली आहे.
आम्ही दिल्लीत जाऊन आमचे म्हणणे मांडले, वसुंधरा राजे यांच्या भ्रष्टाचारावर अनेक महिन्यांपासून पत्रं लिहिली, उपोषण केले, परंतु अद्याप चौकशी झालेली नाही. कारवाई अखेर का झाली नाही हे समजत नाही. आता मी निराश झालो असून जनताच योग्य निर्णय घेईल. जनतेसमोर सर्वांनाच नतमस्तक व्हावे लागेल. भ्रष्टाचाराच्या विरोधात 11 मे पासून अजमेर ते जयपूरपर्यंत पदयात्रा काढणार आहे. 125 किलोमीटर लांबीची ही पदयात्रा असून यात 5 दिवसांचा कालावधी लागणार असल्याचे पायलट यांनी म्हटले आहे.
गेहलोतांकडून पायलट समर्थक लक्ष्य
गेहलोत यांनी पायलट यांच्या गटातील आमदारांवर राजकीय संकटादरम्यान 10-20 कोटी रुपयांची लाच स्वीकारल्याचा आरोप केला होता. तसेच गेहलोत यांनी संबंधित आमदारांना अमित शाह यांच्याकडून घेतलेली रक्कम परत करण्याचा सल्ला दिला होता. अमित शाह, धर्मेंद्र प्रधान आणि गजेंद्र सिंह शेखावत या सर्वांनी मिळून आमचे सरकार पाडविण्याचा प्रयत्न केला होता. राजस्थानात आमदारांना पैसे पुरविण्यात आले होते. हे आमदार पैसे का परत करत नाहीत याची मला चिंता असल्याचे गेहलोत यांनी म्हटले होते.
काँग्रेस नेतृत्वाचा संदेश धुडकाविला
पायलट यांची मंगळवारी पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वी काँग्रेस नेतृत्वाकडून त्यांना संदेश मिळाला होता. पक्षनेतृत्वाने पायलट यांना पत्रकार परिषद स्थगित करण्यास सांगितले होते. परंतु पक्षनेतृत्वाचा आदेश धुडकावून लावत पायलट यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. दरवेळी मलाच का अडविले जाते. गेहलोत यांना कधीच रोखले जात नाही असा तक्रारवजा सूर पायलट यांनी पक्षनेतृत्वाबद्दल काढला आहे.









