चकमकीत तिघांना अटक ः पिस्तूल-काडतुसे जप्त
चंदिगढ / वृत्तसंस्था
पंजाबमधील जालंधर-लुधियाना दरम्यानच्या फगवाडा शहरात रविवारी रात्री उशिरा गँगस्टर्सनी एका पोलीस कॉन्स्टेबलची गोळय़ा झाडून हत्या केली. पेटा वाहन पळवून नेणाऱयांचा पाठलाग सुरू असताना गुंडांनी केलेल्या गोळीबारात पोलीस स्टेशनचे शहर एसएचओ अमनदीप नहार यांचे गनमॅन कमल बाजवा मृत झाले. गुंडांनी त्यांच्यावर गोळीबार केल्याने कमल बाजवा यांना प्राणास मुकावे लागले. या घटनेनंतर फगवाडा पोलिसांनी अधिक माहिती फिल्लौर पोलिसांना दिली. फिल्लौरमध्ये नाकाबंदी करून गुन्हेगारांना रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी झालेल्या चकमकीत तीन गुंडांना गोळय़ा लागल्या आहेत. तिघांनाही अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून पिस्तूल आणि काडतुसे जप्त करण्यात आली आहे. चकमकीनंतर तिघांना अटक झाली असून त्यांचा एक साथीदार अंधाराचा फायदा घेत पळून गेला.
पोलिसांशी झालेल्या चकमकीत गुंडांच्या पायाला आणि हाताला गोळय़ा लागल्या आहेत. रणबीर, विष्णू आणि कुलविंदर अशी जखमी गुंडांची नावे आहेत. पोलिसांनी प्रथम तिघांनाही सिव्हिल हॉस्पिटल फिल्लौरमध्ये नेले. दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना जालंधरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. कडक सुरक्षा बंदोबस्तात त्यांच्यावर उपचार केल्यानंतर पुढील तपासविषयक कारवाई सुरू करण्यात आली.









