वीजखांबाच्या आधारासाठी हेस्कॉमचा अजब कारभार
बेळगाव : वीजखांबाला टेकू देण्यासाठी चक्क गटारीतच खोदकाम करून लोखंडी पाईप उभा करण्यात आला आहे. यामुळे वीजखांबाला ताकद मिळाली असली तरी गटारीच्या नुकसानीबरोबरच सांडपाणी तुंबण्याचा प्रकार घडत आहे. विजयनगर-हिंडलगा येथे करण्यात आलेल्या या प्रकारामुळे स्थानिक रहिवाशांतून संताप व्यक्त होत आहे. पाच ते सहा महिन्यांपूर्वी विजयनगर-हिंडलगा येथे विद्युत खांब उभे करण्यात आले. गॅस गोडावून शेजारी असणाऱ्या एका बोळामध्ये विद्युत खांब उभा करण्यात आला. दोन विद्युतखांबांमधील अंतर अधिक असल्यामुळे एका खांबाला लोखंडी पाईपचा आधार देण्यात आला. परंतु, हा पाईप उभा करताना चक्क गटारीमध्ये खोदाई करून गटारीचे नुकसान करण्यात आले. गटारीतील सांडपाणी या ठिकाणी झिरपत असल्याने आजूबाजूच्या विहिरींचे पाणी दूषित झाले आहे. विद्युतखांबाला आधार देताना संबंधित कंत्राटदाराने कोणताही विचार केलेला दिसून येत नाही. केवळ काम पूर्ण करण्याच्या नादात गटारीमध्ये खोदाई करण्यात आली. या प्रकारामुळे नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. हेस्कॉमने गटारीतील तो लोखंडी पाईप इतरत्र बसवावा व गटार खुली करून द्यावी, अशी मागणी स्थानिक रहिवाशांमधून होत आहे.









