प्रतिनिधी/रत्नागिरी
रत्नागिरी शहरातील भाट्ये समुद्रात डॉल्फिनची झुंड दिसून आली आणि याच झुंडीचा ड्रोन शॉट रत्नागिरीतील गणेश खवळे यांनी घेतला आहे. कोकण पट्ट्यातील रत्नागिरी जिल्ह्याला राज्याला लाभलेल्या 720 कि.मी. लांबीच्या किनाऱयापैकी 180 कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे.
या भागात मोठ्या प्रमाणात जैवविविधता आहे. डॉल्फिनसोबतच विविध प्रकाराचे रंगांचे जेलिफिश शिवाय विविध वनस्पती या आढळतात. तसेच रत्नागिरीचा समुद्र किनारा डॉल्फिनसारख्या माशाला असुरक्षित वाटेल असे नसल्यानेच वारंवार स्थानिक नागरिक आणि समुद्री अभ्यासकांना डॉल्फिन दृष्टीस पडतो. शिवाय काही दिवसांपूर्वीच जयगड येथील समुद्रातही मोठ्या प्रमाणात डॉल्फिनचे वास्तव्य दिसून आले होते. दरम्यान गणेश खवळे यांनी घेतलेल्या ड्रोन शॉटमध्ये जवळपास 18 ते 25 डॉल्फिन भाट्येच्या विस्तीर्ण समुद्रात विहार करताना दिसत आहेत.